Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे संपूर्ण जग हतबल झाले आहे. त्यांनी अलिकडेच घेतलेल्या काही निर्णयामुळे व्यापार युद्ध चालू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी भारतावरही तब्बल 50 टक्के आयात शुल्क लागू करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या याच निर्णयामुळे भारतभरातून संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी भारतासह अन्य देशांबाबतही असेच काही निर्णय घेतले आहेत. दरम्यान, त्यांच्या या धोरणावर जगभरातून टीका केली जात आहे. असे असतानाच ट्रम्प यांच्याच माजी सहकाऱ्याने त्यांचे कान टोचले आहेत. ट्रम्प स्वत:लाच बरबाद करत आहेत, असं या अमेरिकेतील बड्या व्यक्तीने म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सहकारी जॉन बोल्टन यांनीच ट्रम्प यांना सुनावले आहे. भारतावर लावलेला आयात कर हा अमेरिकेसाठीचा धोकादायक ठरू शकतो, असं बोल्टन यांनी म्हटलंय. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध बिढले आहेत. तसेच भारताला आता चीन आणि रशियापासून दूर करण्यासाठी अमेरिकेला पुढची अनेक दशकं लागणार आहेत, असं त्यांनी म्हटलंय. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा उलटा परिणाम झालाय. अमेरिकेचे भारतासोबतचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत, असंही बोल्टन यांनी म्हटलंय.
अमेरिकेने रशियाला नुकसान पोहोचवण्यासाठी भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावले आहे. मात्र यामुळे परिणाम उलटा झाला आहे. या निर्णयाने भारत देश चीन आणि रशियाच्या आणखी जवळ गेला आहे. शिवाय या निर्णायामुळे तिन्ही हे तिन्ही देश अमेरिकेविरोधात एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका सध्या चीनबाबत नरमाईचे धोरण स्वीकारत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका भारताला चीन आणि रशियापासून दूर करू पाहात आहे. पण ट्रम्प यांच्या निर्णयामुळे सगळे उलटे झाले आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, आता ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या आयात शुल्कामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नेमकं काय काय घडणार? चीन-भारत आणि भारत-रशिया यांच्यातील संबंध आणखी दृढ होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.