Ancient Shiva Temple: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुक्कामामुळे ऐतिहासिक महत्त्व मिळालेलं जयसिंहपुरा शिवमंदिर
esakal August 11, 2025 10:45 PM

मकई गेटपासून विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूला दिसते राजधानी अपार्टमेंट. या अपार्टमेंटच्या जागेवर यापूर्वी पुरातन हवेली होती. ती जयसिंगाची हवेली म्हणून ओळखली जायची. मात्र, ती आता इतिहासजमा झाली आहे.

मात्र, त्या हवेलीची साक्ष देत आहे ते राजा जयसिंह यांच्या हवेलीतील त्यांनी बांधलेले पुरातन शिवमंदिर. त्यांच्या हवेलीतील शिवमंदिराचा भाग आता जयसिंगपुऱ्यातील पराक्रम कॉलनीत असून ते मंदिर ‘जयसिंह शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीवर जात असताना या हवेलीत मुक्कामासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांनी जवळच्या खाम नदीतून पाणी आणून शिवाचा अभिषेक करून पूजन केले होते. एवढे महत्त्वपूर्ण शिवमंदिर आज मात्र पूर्णपणे मोठमोठ्या घरांच्या गराड्यात असल्याने सहज सापडत नाही.

राजे जयसिंग औरंगजेबाचे मांडलिक राजे. ते दक्षिणेत असताना त्यांचे वास्तव्य असलेला परिसर म्हणजे आजचा जयसिंगपुरा, सरदार राजे जयसिंह यांच्या जयसिंगपुरा या भागातील सुमारे पाच एकर जमिनीवरील त्यांच्या हवेलीच्या परिसरातील हे शिवमंदिर आहे. शिवमंदिर मात्र खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. मंदिराच्या आकर्षक प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला मोठे बेलाचे झाड असून या झाडाला तीन पाने एकत्रच असलेली पाने येतात. बेलाची तीन पाने असतात मात्र त्याला तीन वेगवेगळे देठ असतात. परंतु, या ठिकाणी असलेल्या बेलाच्या झाडाला एकाच पानात तीन पानांचे कोन आहे.

गाभाऱ्यामध्ये महादेवाची तांब्याची पिंड आहे. त्या पिंडीवर नागफणीचे छत्र असून पिंडीच्या बाजूला डमरू आणि त्रिशूळ आहे. तर, पिंडीच्या मागच्या बाजूला गाभाऱ्यात विघ्नहर्त्या गणरायाची शेंदरी मूर्ती आहे. मंदिराच्या कळसाला नागराजाने वेटोळे घातलेले दिसते. मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अॅड. महेश कानडे यांनी सांगितले, राजस्थान सरकारकडे पुरंदरच्या तहाच्या संदर्भातील सुमारे २२ फूट लांबीच्या कागदावर लिहिलेला मूळ दस्तऐवज (सध्या तो बिकानेर येथील पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात आहे) असून त्यात आग्रा प्रवासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुक्कामांच्या ठिकाणांची व शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.

त्यामध्येच जयसिंगपुरा येथील हवेलीतील त्यांच्या मुक्कामाचा उल्लेख असल्याचे कानडेंनी सांगितले. या मंदिराविषयीच्या लिखित कागदपत्रांवरून पूर्वी हे शिवमंदिर जयपूर येथील राजस्थान ट्रस्टकडे होते. दिवंगत नारायण हरी ऊर्फ बापूसाहेब कानडे यांनी या परिसरातील बंगला खरेदी केला.

Pinakeshwar Mahadev Temple: अजिंठा डोंगररांगेतील पिनाकेश्वराचे मंदिर; श्रावणातील तिसऱ्या सोमवारी कावड यात्रेकरू करतात जलाभिषेक

तेव्हा राजस्थान ट्रस्टशी संपर्क करून त्यांनी त्याची नोंद २६ मे १९६६ रोजी कायद्यानुसार मंदिराचे सार्वजनिक विश्वस्त संस्थेत रूपांतर करून घेतले. त्यानंतर पडझड झालेल्या कंपाउंड वॉलची दुरुस्ती, सफाई करून दरवर्षी शिवरात्रीसाठी रंगरंगोटी, दुरुस्ती आणि नित्य अभिषेक पूजा सुरू केली. या मंदिराला जयसिंह शिवमंदिर असे नाव दिले. सुमारे सोळा वर्षे त्यांचे सेवाकार्य सुरू होते. त्याच्यापूर्वी जयसिंगपुऱ्यातील रहिवासी व शिवभक्त दिवंगत लाला चंदलालजी जैस्वाल या शिवमंदिराची देखभाल व पूजा अत्यंत निष्ठेने करीत असल्याचा उल्लेख आहे. भलेही लवकर सापडत नसले तरी एकदा का होईना या मंदिराला भेट दिली पाहिजे, असे हे मंदिर आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.