भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात इतिहास घडवला. वूमन्स टीम इंडियाने 5 मॅचची टी 20I सीरिज 3-2 ने आपल्या नावावर केली. तर त्यानंतर तिसरा सामना जिंकत 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत यजमान इंग्लंडचा 2-1 ने धुव्वा उडवला. इंग्लंड दौऱ्यातील राधा यादव हीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील इंडिया ए टीमच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली. मात्र इंडिया ए टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ए टीम विरुद्ध टी 20I मालिकेत विजयाचं खातंही उघडू शकली नाही. वूमन्स ऑस्ट्रेलिया ए ने इंडिया ए टीमचा सुपडा साफ केला. ऑस्ट्रेलिया ए टीमने ही मालिका 3-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली.
ऑस्ट्रेलिया ए संघाने सलग 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. त्यामुळे इंडिया ए समोर रविवारी 10 ऑगस्टला तिसरा आणि अंतिम सामना जिंकून ऑस्ट्रेलियाला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्याचं आव्हान होतं. मात्र ऑस्ट्रेलियाने हा सामना अवघ्या 4 धावांनी आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे मॅकेमध्ये करण्यात आलं होतं.
ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 145 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला 8 विकेट्स गमावून 140 धावाच करता आल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. विजयी धावांचा पाठलाग करताना शफाली वर्मा हीने 41 धावांची स्फोटक खेळी केली. मात्र इतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. त्याआधी कर्णधार राधा यादव आणि प्रेमा रावत या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 144 धावांवर गुंडाळल.
ऑस्ट्रेलियासाठी एलिसा हीली हीने 27 तर ताहलिया विल्सनने 14 धावा केल्या. या दोघींनी 37 धावांची सलामी भागीदारी केली. हीलीने 21 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 षटकारासह 27 धावा केल्या. तर एनिका लीरॉयडने 17 बॉलमध्ये 22 रन्स केल्या. मेडलिन पेना हीने 39 धावा जोडल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 150 पार जाता आलं नाही.
भारताने विजयी धावांचा पाठलाग करताना दुसऱ्याच ओव्हरमध्ये वृंदा गणेश (4 धावा) हीच्या रुपात पहिली विकेट गमावली. उमा चेत्री 3 धावा करुन माघारी परतली. तर दुसऱ्या बाजूला शफाली टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत होती. शफालीने 25 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 41 धावा केल्या. त्यानंतर शफाली आऊट झाली. राघवी बिष्ट (25) आणि मिन्नू मणी (30) या जोडीने चौथ्या विकेटसाठी 48 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे टीम इंडयाने 100 पार मजल मारली. मात्र त्यानंतर भारताची घसरगुंडी झाली. भारताने 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाने अशाप्रकारे विजयी धावांचा यशस्वी बचाव केला आणि सलग तिसरा विजय मिळवला.