आज पवित्र श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आहे. या खास दिवशी अनेक भाविक देवदर्शनाला जात असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यात भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जाताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेत 9 महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत 30 ते 35 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
श्रावणी सोमवार निमित्त खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कुंडेश्वर या ठिकाणी दर्शन करण्यासाठी पाईट येथील काही महिला भाविक पीकअप टेम्पो मधून जात होत्या. मात्र चढावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन सुमारे 25 ते 30 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात नऊ महिला भाविकांचा मृत्यू झाला असून 35 प्रवासी जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, देव दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावर घाट चढताना पीकअप माग सरकले आणि खोल दरीत जाऊन कोसळले. दरीत जातानाया पिकअपने 5 ते 6 पलटी मारल्या. त्यामुळे या पिकअपमधून प्रवास करणाऱ्या 9 महिलांचा मृत्यू झाला असून इतर महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातानंतर मोठा आरडाओरडा सुरु झाला, त्यानंतर स्थानिक लोक मदतीला धावले आणि त्यांनी जखमी महिलांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या घटनेत काही महिला शेतात पडल्या होत्या. त्यांनाही रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अपघातात शोभा ज्ञानेश्वर पापड, सुमन काळूराम पापड, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई न्यानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे या महिलांचा मृत्यू झाला आहे.
तसेच अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरघे, जया बाळू दरेकर, लता ताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ , जयश्री पापळ, शकुंतला चोरगे, मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे यांच्यास इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.