Pune Railway Development : हडपसर टर्मिनलसाठी नवीन रस्ता, दोन महिन्यांत मार्ग होणार तयार; प्रवाशांसाठी सोयीचे
esakal August 12, 2025 04:45 AM

पुणे : हडपसर टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वे प्रशासन स्थानकावर व स्थानकाच्या बाहेरदेखील पायाभूत सुविधांवर भर देत प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन रस्ता बांधत आहे. रेल्वे प्रशासन १०० मीटर लांबीचा व साडेसात मीटर रुंदीचा रस्ता करीत आहे. येत्या दोन महिन्यांत हा मार्ग पूर्ण होईल. हा रस्ता तयार झाल्यावर प्रवाशांना हडपसर स्थानकावर येणे अत्यंत सोयीचे होणार आहे. हडपसर स्थानकाच्या पाठीमागच्या बाजूला हा रस्ता तयार करण्यात येत आहे.

हडपसर टर्मिनल विकसित झाल्यानंतर या स्थानकावरून रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची वाहतूक वाढणार आहे. मात्र, या ठिकाणी येण्यासाठी अत्यंत अरुंद असा रस्ता आहे. हा रस्ता पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येतो. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच्या मुख्य रस्त्याची रुंदीदेखील कमी असल्याने चारचाकी वाहनांना येण्यास अडचणी येत होत्या. टर्मिनलचा विकास करताना रेल्वे प्रशासनाने आपल्या ताब्यातील इमारती व कार्यालय पाडून त्या ठिकाणच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोकळी जागा उपलब्ध करून दिली आहे.

Pune Railway Station : पुण्याच्या रेल्वे इतिहासात नवा टप्पा; हडपसर अन् खडकी टर्मिनलच्या रूपाने होणार रेल्वेगाड्यांचे विकेंद्रीकरण

त्यामुळे येत्या काळात हडपसर स्थानकावरून रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यानंतर प्रवाशांची वाढणारी वाहतूक लक्षात घेता दोनरस्ते उपलब्ध होणार असल्याने निश्चितच प्रवाशांच्या दृष्टीने ते सोयीचे ठरणार आहे. रस्ते झाल्यानंतर पीएमपी प्रशासनदेखील तिथे शटल सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना बसने हडपसर स्थानकापर्यंत पोचणे कमी खर्चाचे होणार आहे.

अशा आहेत सुविधा
  • पीएमपी प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठीहडपसर टर्मिनल ते हडपसर आगार अशी सेवा सुरू करणार

  • ही फिडर सेवा असून, यासाठी तीन बसचा वापर होणार आहे

  • फिडर सेवेमुळे प्रवाशांना कमी दरात प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार

अशी आहे सद्यःस्थिती
  • सध्या १४ डेमूला थांबा

  • १० मेल एक्स्प्रेसला थांबा

  • दैनंदिन चार हजार प्रवाशांची वाहतूक

  • नवीन सेवा सुरू झाल्यावर प्रवासी गाड्या व प्रवाशांच्या संख्येत होणार वाढ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.