Asia Cup 2025 : यशस्वी-ऋषभला आशिया कपमधून डच्चू! अमरावतीच्या खेळाडूला विकेटकीपर म्हणून संधीची शक्यता
Tv9 Marathi August 12, 2025 06:45 AM

टीम इंडिया आता आशिया कप 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी अजून संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची ऑगस्ट महिन्यातील चौथ्या आठवड्यात घोषणा केली जाऊ शकते. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाचा युवा ओपनर यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत या दोघांना संधी मिळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. यशस्वी आणि पंत या दोघांना संधी मिळणार असल्याचा दावा केला जात होता. तसेच या दोघांना संधी देण्यात यावी, असं काही दिग्ग्जांचं म्हणणं होतं.

इंडियन एक्सप्रेसनुसार, यशस्वी आणि ऋषभ या दोघांचा टी 20 टीमसाठी विचार करण्यात आलेला नाही. भारताकडे विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आहे. टीम मॅनेजमेंटला संजूवर विश्वास आहे. संजू ओपनिंग करु शकतो. तसेच अभिषेक शर्मा सलामीवीर म्हणून दुसरी पसंत आहे. त्यामुळे यशस्वीसाठी संधीच नाही.

केएल राहुल याच्यापेक्षा जितेश शर्मा याचा दावा मजबूत

रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल याचं टी 20 संघात कमबॅक होण्याची शक्यता कमी आहे. संजूनंतर अमरावतीकर आणि आरसीबीला आयपीएल ट्रॉफी (IPL 2025) जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जितेश शर्मा हा विकेटकीपर म्हणून दुसरी पसंत आहे. जितेशने गेल्या काही महिन्यात त्याच्या खेळात सुधारणा केली आहे. जितेश फिनीशर म्हणूनही उदयास आला आहे. तसेच विकेटकीपिंह ही त्याची जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजूला रियान पराग आणि रिंकु सिंह या दोघांना गेल्या काही महिन्यांमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला आहे.

श्रेयस अय्यर याचं कमबॅक होण्याची शक्यता!

दरम्यान आशिया कप स्पर्धेनिमित्ताने भारतीय संघात मुंबईकर श्रेयस अय्यर याचं कमबॅक होऊ शकतं. श्रेयस फिरकी गोलंदांजांविरुद्ध चांगला खेळतो. तसेच श्रेयसने आयपीएलमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे आता कुणाला संधी मिळते आणि कुणाला डच्चू? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.