ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी, ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती. ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते. 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते’ असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला होता. शरद पवारांच्या या गौप्यस्फोटामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. शरद पवारांच्या या विधानाला आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
राधाकृष्ण विखे पाटील धाराशिवमध्ये माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मतपेट्यांचं काम सुरु होतं तेव्हा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात मतपेट्यांची फेरफार केली. त्यांना जसे दिल्लीत लोकं भेटली होती, मलाही काही लोकं भेटले होते. 1991 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी मतपट्यांमध्ये फेरफार केली होती. मतपत्रिका कशा बदलल्या जायच्या, त्या मोबदल्यात किती अधिकाऱ्यांना त्यांनी चांगल्या पदावर नेमलं. हे मला लोकांनी सांगितलं आहे असं विखे पाटील म्हणाले.
तत्पूर्वी धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागातील कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विखे पाटलांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या आमच्या जाणत्या राजाने माझा महाराष्ट्र उपाशी ठेवला. फक्त एकमेकाची जिरवायची, घरे फोडायची काम केलं असं विखे यांनी म्हटलं होतं.
पुढे बोलताना विखेंनी, अनेक वर्ष या राज्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, चार चार वेळा जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले दुर्दैवाने महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाकडे त्यांचं दुर्लक्ष राहिलं. दुष्काळी भागाला पाणी देणे हे अनुत्पादक स्वरूपाचे, तोट्याचे काम आहे. हा विचार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व आपल्या राज्याला गेल्या अनेक वर्ष लाभलं. आपण अनेक वर्ष या लोकांच्या भूलथापांना बळी पडलो.
आज मराठवाडा किंवा जो दुष्काळी भाग महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो, केवळ एकाच भागात विकासाच्या दृष्टीने पुढे जायचा प्रयत्न झाला. राज्य अधिक दुष्काळाच्या खाईत लोटण्याचं काम झालं. मात्र आता दुष्काळ मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हा देवेंद्र फडणवीस यांनी संकल्प केला आहे असंही विखे पाटील म्हणाले.