राख्या पाहून मुलांच्या चेहऱ्यावर उमटला आनंद
‘मनपरिवर्तन केंद्रा’तील मुलांना मिळाला सुखद सहवास
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : शिवतुतारी प्रतिष्ठानकृत कविता डॉट कॉम संस्थेच्या सदस्यांनी रविवारी (ता. १०) कल्याण तालुक्यातील मामनोली येथील ‘समतोल फाउंडेशन संचालित मनपरिवर्तन केंद्रा''तील मुलांचा दिवस खास बनवला. एकदिवसीय सहलीनिमित्त केंद्रातील मुलांना राख्या बांधून, वह्या-पुस्तके व खाऊवाटप करून त्यांचा दिवस गोड केला. परिवारापासून दुरावलेली, विविध कारणांनी वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेली मुले ‘समतोल फाउंडेशन''च्या या केंद्रामध्ये शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणासाठी दिली जातात. नंतर पोलिस, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने त्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या १८ वर्षांत लाखो मुलांचे पुनर्वसन करण्यात यश आले आहे.
कार्यक्रमात समाजसेवक रवींद्र औटी यांनी मुलांना वह्या वाटल्या, पत्रकार राजेंद्र घरत यांनी वाचनासाठी पुस्तके दिली, तर सीनियर सिटिझन हेल्थकेअर फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पाटणकर आणि संत सावता माळी समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत थोरात यांनी मिठाई, खाऊ आणि कपड्यांचा वाटा दिला. कविता डॉट कॉमचे निर्मिती सूत्रधार रवींद्र पाटील यांनी सर्वांनी केलेल्या सहकार्याचे कौतुक केले व भविष्यातही मदतीसाठी तयार असल्याचे सांगितले. कविता डॉट कॉमच्या निवडक कवींनी कविता सादर केल्या तर लहान मुलींनी बोलगाणी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. केंद्रातील मुलांनी त्यांच्या बालपंचायतबाबत माहिती दिली. ‘समतोल''चे संस्थापक सचिव विजय जाधव यांनी संस्था चालवित असलेल्या विविध सेवाकार्यांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सदस्यांनी केंद्रातील शेती, लागवड, गोशाळा आणि इतर प्रकल्प पाहिले तसेच शेजारील नदीत डुबकी मारून आनंद घेतला.