ठाकरेंच्या त्या आरोपांआधीच कुणाल कामराचं 4 शब्दांचं ट्वीट, उडवून दिली खळबळ!
Tv9 Marathi August 12, 2025 08:45 AM

Kunal Kamra : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांसदर्भात केलेल्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह देशात इतरही ठिकाणी मतांची चोरी करण्यात आली, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे. हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावेही सादर केले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांनी आता निविडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आज (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि निवडणुकीविषयी गंभीर दावे केले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच कॉमेडियन कुणाल कामरा याने एक चार शब्दांचे ट्वीट करून देशात खळबळ उडवून दिली आहे.

कुणाल कामरा याने नेमकं काय म्हटलंय?

कुणाल कामरा यानेदेखील आपल्या ट्विटमध्ये निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. गेल्या काही दिवसांपासून तो देशातील निवडणूक घेण्याची प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. याआधी त्याने 7 ऑगस्ट रोजी एक ट्विट् करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची द सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणत खिल्ली उडवली होती. आता त्याने अवघ्या चार शब्दांचे ट्वीट करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. त्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाला थेट इलेक्शन कॉम्प्रोमाईज ऑफ इंडिया असे म्हणत या स्वायत्त संस्थेची निर्भर्त्सना केली आहे.

*Election Compromise of India*

— Kunal Kamra (@kunalkamra88)

उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत काय आरोप केले?

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाची भूमिका, निवडणूक घेण्याची प्रक्रिया तसेच इतर मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झाली, असा आरोप केला. भाजपावरचं संकट आणि मतांची झालेली चोरी जी पकडली गेलीय ती कशी लपवता येईल याचा आटापीटा उघड उघड आहे, असा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय. तसेच लोकशाहीची लढाई तुम्ही चेपून टाकत आहात आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीची हत्या दिवसाढवळ्या होत आहे, असा आरोपही ठाकरेंनी केला. सहा महिन्यांत जवळपास 45 लाख मतं वाढली. ही मतं कुठून आली, त्यामुळे आपलं नाव तपासून घ्या, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.