कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या 15 ऑगस्ट रोजी सर्व चिकन, मटण दुकाने, कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कोणताही प्राणी कत्तल किंवा मांस विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या कलम 334, 336 आणि 374(अ) नुसार कारवाई होईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.
बंदी मागे घेण्याची मागणीकल्याण डोंबिवली महापालिकेने चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातली आहे. पालिकेचा उद्देश स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि पवित्र वातावरणात साजरा करण्याचा असल्याचे आदेशात नमूद केले आहे. याबाबतच्या नोटीसा महापालिका क्षेत्रातील चिकन व मटन विक्रेत्यांना देण्यात आल्या हेत. मात्र या निर्णयाविरोधात हिंदू खाटिक समाजाने आक्रमक पवित्र घेतला. आज महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेत ही बंदी मागे घेण्याची मागणी केली.
खाटीक समाजाचा इशाराकल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्डे आहेत ,स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आहे,पाणी समस्या आहे, अशी बरीच कामे कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखे आहेत मात्र ती केली जात नाहीत 15 ऑगस्ट निमित्त चिकन व मटन विक्री बंद ठेवून ते आमच्या पोटावर पाय देतायत. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा येत्या 15 ऑगस्टला महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच मटन विक्री करण्यात येईल असा इशारा खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड केडीएमसी मुख्यालयात मांसाहार करणार15 ऑगस्ट कल्याण डोंबिवलीतील चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे. निर्णय मागे घ्या अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड केडीएमसी मुख्यालयात मांसाहार करणार असल्याचे शरद पवार गटाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी केडीएमसीमध्ये मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
शिंदे गट आणि राष्ट्रवादीत जुंपलीपालिकेच्या या आदेशानंतर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.
बाळ्या मामा मात्रे यांनी म्हटले की, “मी आगरी-कोळी समाजात जन्माला आलोय, लहानपणापासून आमच्या समाजात मासे खाण्याची परंपरा आहे. कोणी काय खायचं नाही खायचं हा वैयक्तिक विषय आहे, त्यावर बंधन घालण्याची गरज नाही.”
शिवसेना (शिंदे गट) चे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मात्र निर्णयाचे समर्थन केले. “स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी बळी दिले जाणे थांबावे म्हणून हा निर्णय योग्य आहे. श्रावण महिना सुरू आहे, बऱ्याच जणांनी नॉनव्हेज खाणे टाळले आहे. एक दिवस नॉनव्हेज न खाल्ले तरी काही फरक पडत नाही” असं विश्वनाथ भोईर यांनी म्हटलं आहे.