विजय चौलकरांना ‘मॉडेल लाभार्थी’ म्हणून राष्ट्रपती भवनात निमंत्रण
मुरूड, ता. ११ (बातमीदार) ः मुरूड शहरातील रंगकर्मी विजय लक्ष्मण चौलकर यांची केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील ‘मॉडेल लाभार्थी’ म्हणून निवड झाली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या विशेष समारंभासाठी त्यांना मानाच्या निमंत्रित म्हणून बोलावण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या कार्यक्रमासाठी केवळ एकमेव लाभार्थी म्हणून चौलकर यांची निवड झाली असून, ही रायगड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
राष्ट्रपती भवनाकडून अधिकृत निमंत्रणपत्र व समारंभाचा विशेष पास चौलकर यांना प्राप्त झाला आहे. या निवडीमुळे मुरूड व रायगड जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. देशभरातील फक्त १० निवडक लाभार्थ्यांपैकी एक म्हणून चौलकर या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत. विजय चौलकर हे मुरूडमधील गणेश आळीत वास्तव्यास असून, रंगकाम व्यवसायातून ते आपला उदरनिर्वाह करतात. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे त्यांनी सांगितले. मुरूड-जंजिरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व शहर अभियंता जयकृष्ण भिसे यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना सुरळीत पार पडली. लाभार्थी निवड, कागदपत्रांची पूर्तता आणि मंजुरी प्रक्रियेत नगर परिषदेने घेतलेली मेहनत उल्लेखनीय असल्याचे चौलकर यांनी नमूद केले.