मोठी बातमी! भर समुद्रात जहाजांची एकमेकांना धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
GH News August 12, 2025 01:19 AM

Ship Accident : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आजघडीला अत्यंत प्रगत अशी जहाजे तयार करण्यात आली आहेत. कित्येक टन वजन वाहून नेऊ शकणारे व्यापारी जहाज आजघडीला अस्तित्त्वात आहेत. मात्र कितीही प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरलेले असले तरी अनेकदा भर समुद्रात जहाजांसोबत मोठे आणि भीषण अपघात घडतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण चीनच्या सागरात दोन जहाजांची मोठी टक्कर झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (11 ऑगस्ट) दक्षिण चीन सागरात स्कारबोरो शोल या भागात चीनमधील दोन जहाज एकमेकांवर आदळले आहेत. या अपघातातील एक जहाज हे चीन तटकरक्ष बदलाचे तर दुसरे जहाज हे चीनच्या नौसेनेचे आहे. फलिपिन्सच्या तटरक्षक जहाजांना रोखण्याच्या प्रयत्नातून हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे.

अपघात नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार चीन आणि फिलीपिन्स यांच्यातील वादग्रस्त क्षेत्रात फिलीपिन्स तटरक्षक दलाचे जहाज गेले होते. स्थानिक मच्छिमारांच्या तक्रारीनंतर हे जहाज तिथे पोहोचले होते. तिथे पोहोचल्यानंतर फिलीपिन्स तटरक्षक जहाजाने एकूण 35 मच्छीमारांना रेस्क्यू केले. तसेच त्यांच्या जाहाजालाही वाचवले. हीच बाब चीनच्या तटरक्षक दलाला समजली. त्यानंतर चीनचे जहाजही या वादग्रस्त सीमाक्षेत्रात आले. चीनचे जहाज आपल्याकडे येत असल्याचे समजताच फिलीपिन्सच्या तटरक्षक दलाच्या जहाजाने तेथून पळ काढला. याच वेळी फिलीपिन्स तटरक्षक दलाच्या जहाजाचा पालाग करताना चीनच्या तटरक्षक दलाच्या जहाजाच्या मध्ये चीनच्या नौसेनेचे जहाज आले. यावेळी चीनच्या तटरक्षक दलाच्या तसेच चीनच्या नौसेनेच्या जहाजांची टक्कर झाली.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या अपघातात अद्यापतरी जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.