एका जुनाट आजाराचा भ्रम
esakal August 12, 2025 10:45 AM

सद्गुरू: आजारपण म्हणजे काय? संसर्गजन्य आजारांना बाजूला ठेवू या कारण ते वेगळे आहेत - ते बाहेरून येणारे आक्रमण आहे, ज्याकरिता औषधांची गरज असते - आजारपण हे आपण स्वतःच्या आत निर्माण केलेल्या व्याधींमुळे येते.

जगातील सत्तर टक्क्यांहून अधिक आजार हे स्व-निर्मित असतात. शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये जगण्याची नैसर्गिक ओढ असते; भौतिक शरीराला निरोगी राहण्याची, जगण्याची आणि शक्य तितके स्वतःचे रक्षण करण्याची नैसर्गिक ओढ असते. तरीही, असे असताना, आपलेच शरीर किंवा शरीरातील काही भाग किंवा घटक आपल्याविरुद्ध का काम करतात? ही अशी एक गोष्ट आहे, जी सतत दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तिच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जर आपण आपल्या शरीराकडे पाहिले, तर आपण आत्ता जसे आहोत तसे जन्माला आलो नव्हतो. तुम्ही तुमच्या आईच्या गर्भात केवळ दोन पेशींपासून सुरुवात केली, नंतर बाळ म्हणून बाहेर आलात आणि आता तुम्ही इतके मोठे झाला आहात. हे सर्व कसे घडले? जी मूलभूत शक्ती हे शरीर निर्माण करत आहे - निर्मितीचा आधार, ज्याला तुम्ही निर्माता म्हणता - ती तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी शरीरात कार्यरत आहे.

शरीराचा निर्माता आत आहे. दुरुस्तीचे काम करायचे असेल, तर तुम्हाला निर्मात्याकडे जायला आवडेल, की जवळच्या मेकॅनिककडे? जर तुम्हाला निर्मात्याचा पत्ता माहीत नसेल, तर तुम्ही जवळच्या मेकॅनिककडे जाता, पण जर तुम्हाला निर्माता माहीत असेल आणि त्याच्यापर्यंत पोहोचता येत असेल, तर तुम्ही निश्चितच निर्मात्याकडे जाल.

तुम्ही आतून निर्माण करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी डॉक्टरकडे धावत जाणे व्यर्थ आहे. वैद्यकीय व्यवसाय तुम्हाला फक्त जुनाट आजार सांभाळण्यासाठी मदत करू शकतो, ते तुम्हाला त्यापासून कधीही मुक्त करू शकत नाहीत, कारण तो बाहेरून आलेला नाही.

तो बाहेरून आला असता, तर ते तो काढून टाकू शकले असते; पण जेव्हा तो आतून येतो - जेव्हा तुम्हीच तो निर्माण करत असता, मग ते तुम्हाला त्या आजारापासून कसे मुक्त करू शकतील? दररोज ते तुमच्या आत अधिक रसायने टाकतील; पण दररोज तुम्ही स्वतःमध्ये अधिक आजार निर्माण कराल.

हा मूलभूत प्रकार बदलल्याशिवाय, आरोग्य खरोखर लाभणार नाही. तर मी ज्याला ‘इनर इंजिनिअरिंग’ म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे: निर्मात्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करणे, जेणेकरून आरोग्य हे तुमचे काम नाही, तर ते त्याचे काम ठरते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.