पारंपरिक लोककलांसाठी तरुणांचा पुढाकार
गणेशोत्सवानिमित्त गावागावांत नृत्य-गायनाची तालीम
अमित गवळे ः सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ११ (वार्ताहर)ः महाराष्ट्राला लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. दशावतारी नाटक, शक्तीतुरा, डबलबारी, भजन, कीर्तन, जाखडी नृत्य, बाल्या नाचाला महत्त्व आहे, पण काळाच्या ओघात जनाधार नसल्याने संकटात होत्या, पण विद्येच्या देवतेच्या आगमनाने लोककलांना पुन्हा सुगीचे दिवस आले असून, रायगड जिल्ह्यातील गावा-गावात रंगीत तालीम सुरू झाली आहे.
श्रावणात महिलांचे मंगळगौरीचे खेळ, भाद्रपद महिन्यात गणेशोत्सव, नवरात्री उत्सवात कोकणात विविध लोककला गावागावात सादर होतात, मात्र नोकरीनिमित्त शहराकडे आलेला चाकरमानी आता कलेपासून दुरावला आहे, पण गावातील तरुण कला जोपासण्यासाठी एकत्र येत असल्याचे चित्र सध्या गावागावात आहे. सुधागड तालुक्यातील श्री दत्त गुरु नाच मंडळाने जाखडी नाच २२ वर्षांपूर्वी बंद केला होता, मात्र ही कला जिवंत ठेवण्यासाठी चव्हाणवाडी ग्रामस्थ मंडळाने पुढाकार घेतला आहे. बाळकुम येथील मंदिरात दर शनिवार-रविवार मंडळाचे सदस्य रंगीत तालीम करत आहेत. गावच्या तरुण मंडळींचा नृत्यात मोठा सहभाग असतो.
-----------------------------
मुलांबरोबर मुलींचा सहभाग
ठाणे आणि भिवंडीमध्ये पुंडलिकबुवा मोरे यांच्या माध्यमातून नवीन होतकरू कलाकार मंडळींना तेजस मोरे, सौजस मोरे लोकसंगीताचे धडे देत आहेत. गावची कलाकार मंडळी फावल्या वेळात जाखडी नृत्य, शक्ती तुरा, भजन कीर्तनात दंग होत आहेत. आपली संस्कृती टिकवण्यासाठी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेतात. यामध्ये मुलांबरोबर मुलींचासुद्धा सहभाग आहे.
-----------------------------------------
कला टिकवण्यासाठी मेहनत
आधुनिक युगात बाल्या, माळी नाचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तरुण पिढीने पाठ फिरवल्याने लोककला लोप पावत चालली आहे, पण पूर्वजांचा हा वारसा टिकावा, यासाठी पेण तालुक्यातील दुरशेत गावातील सुशिक्षित तरुणही सरसावले आहेत. या मंडळात पदवीधर, इंजिनिअर तरुणांचा सहभाग आहे, मात्र प्रत्येकजण कोणताही संकोच न बाळगता ही कला टिकवण्यासाठी मेहनत घेत आहेत.
------------------------------
भावी पिढीला ही कला समजावी, यासाठी १५ वर्षांपासून बाल्या, माळी नाच ही कला जतन करत आहोत. पारंपरिक कला टिकावी, यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. त्याला ग्रामस्थांकडूनही प्रोत्साहन मिळत आहे.
- समाधान म्हात्रे, कलाकार, दुरशेत, पेण