वेल्हे, (पुणे) - जसजसा काळ बदलत गेला तसे प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडत असल्याचे आपणास सभोवताली जाणवते. मात्र, पिढ्यान पिढ्यांची परंपरा असलेली सामूहिक शेती तीही ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक लोकगीते गात ज्येष्ठ नागरिकांसह, महिलांसह होते.
अशा प्रकारची शेती ऐतिहासिक किल्ले तोरणा गडाच्या पायथ्याशी होत असून त्याचाच प्रत्यय नागरिकांना आला असून सोशल मीडियावर या पारंपरिक शेती मशागतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होऊन तो कुतूहलाचा विषय बनला असून खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या सामूहिक शेतीचे कौतुक केले आहे.
राजगड तालुक्यामध्ये नाचणी, वरई मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर केली जाणारी ही शेती खऱ्या अर्थाने सेंद्रिय पद्धतीने होत असते. डोंगराच्या उतारावर पावसाळ्याच्या सुरुवातीला नाचणी वरई पिकांच्या रोपांची लागवड केली जाते. यानंतर पडत असलेल्या पावसामुळे यामध्ये गवत, झुडपे वाढली जातात.
त्यानंतर जी मशागत केली जाते ती मशागत या परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात करतात तिला खुरपणी म्हणतात तर आदिवासी भाषेमध्ये याला पडकही किंवा हातारगी म्हणून संबोधले जाते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून तालुक्यामध्ये उघडीप दिल्याने पारंपारिक नाचणी वरई पिकांच्या खुरपणीला रविवार (ता.१०) रोजी सुरुवात झाली.
यावेळी शेतकरी कैलास बोराणे, बापू गाडे, भाऊ बालगुडे, अनिल गाडे, चंद्रकांत महाडिक, बाळू सांगळे, गणपत वेगरे, सनी साबळे, दशरथ दिघे, बबन वेगरे, नितीन वेगरे, रामदास दिघे, नथू महाडिक, वसंत महाडिक, दत्तात्रय वेगरे, जानू कचरे, कोंडीबा वेगरे, दीपक भोंडेकर, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर या काम करणाऱ्या मजुरांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी शंकर नाना भूरूक, दीपक भोंडेकर, निवृत्ती गाडे, यांनी ढोल वाजविले.
तालुक्यातील किल्ले तोरणा व राजगड परिसरामधील वेल्हे, भट्टीवाघदरा, गेळगणी,अठरा गाव मावळ परिसर, बारागाव मावळ, परिसर रायगड जिल्ह्याचे हद्दीवरील तव, घोल, दापसरे, टेकपोळे, घिसर, रायंदरवाडी, एकलगाव, सिंगापूर, मोहरी या गावांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर या पिकांची पेरणी केली जाते.
डोंगर उतारांवर केल्या जाणाऱ्या या शेतीमध्ये खुरपणी करताना कमी वेळामध्ये अधिक काम व्हावे व मजुरांना थकवा जाणवू नये व परिसरातील हिंसक प्राणी बाजूला जावेत या उद्देशाने मोठ्या प्रमाणात ढोल झांज ताशा व पारंपारिक गायन गायले जाते.
- शंकर नाना भूरूक, स्थानिक शेतकरी, वेल्हे.
कृषी संस्कृतीचे वैभव शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या उत्सवातून दिसून येते. वेल्हे येथे सुरू पडकही उत्सव उत्साहात सुरू असून देशाचे सांस्कृतिक वैविध्यच आपल्या देशाच्या समृद्ध वारशाची खरी ओळख आहे.
- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती लोकसभा मतदारसंघ