आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेला मोजून 50 दिवस बाकी आहेत. वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 च्या थराराला 11 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 2 नोव्हेंबरपर्यंत एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच एकूण 5 स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सामन्यांचा थरार रंगणार आहे. भारताकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. हरमनप्रीत कौर या स्पर्धेत भारताचं नेतृत्व करणार आहे. आम्ही भारताच्या आयसीसी वर्ल्ड कप विजयाची प्रतिक्षा संपवू असा विश्वास महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने व्यक्त केला. मुंबईत 11 ऑगस्टला महिला वनडे वर्ल्ड कप ट्रॉफी 2025 चं अनावरण करण्यात आलं. यावेळेस हरमनप्रीतने ही प्रतिक्रिया दिली. यावेळेस मंचावर आयीसीसी अध्यक्ष जय शाह, बीसीसीआय पदाधिकारी, माजी भारतीय कर्णधार मिताली राज, माजी भारतीय फलंदाज युवराज सिंह, भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि जेमीमाह रॉड्रिग्स उपस्थित होते.
मेन्स टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला. भारताने यासह 14 वर्षांची प्रतिक्षा संपवली. आता भारतीय महिला संघासमोर वर्ल्ड कप जिंकण्याचं आव्हान आहे. भारतीय महिला संघाला आतापर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीने 2017 आणि 2020 मध्ये हुलकावणी दिली होती. भारताला दोन्ही वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मात्र आता फायनलचा अडथळा पार करत वर्ल्ड कपची प्रतिक्षा संपवणार असल्याचं हरमनप्रीतने म्हटलं.
“आम्हाला आयसीसी ट्रॉफी जिंकून साऱ्या देशवासियांची अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवायची आहे. वर्ल्ड कप कायमच खास असतो. मला नेहमीच माझ्या देशासाठी काहीतरी खास करायच असतं. मी जेव्हा जेव्हा युवी भय्याला (युवराज सिंग) पाहते तेव्हा खूप प्रेरणा मिळते”, असं हरमनप्रीतने म्हटलं.
दरम्यान महिला ब्रिगेड आयसीसी वूमन्स वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघातील या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. याबाबतही हरमनने प्रतिक्रिया दिली.
वूमन्स वर्ल्ड कप 2025 चं काउंटडाऊन सुरु
“ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणं कायम आव्हानात्मक असतं त्यामुळे आम्हाला आमच्या स्थितीबद्दल माहित होतं. ही मालिका आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढेल”, असंही हरमनप्रीतने नमूद केलं.