Sanjay Gaikwad : राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. महायुतीच्या रुपात भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष सध्या सत्तेत आहेत. मात्र सत्तेत एकत्र असले तरी वेगवेगळ्या कारणांमुळे या तिन्ही पक्षांत नाराजीनाट्य रंगत आलेले आहे. विशेष म्हणजे आमदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठीचा निधी तसेच मंत्र्यांना त्यांच्या खात्याला मिळणारा निधी या दोन मुद्द्यांवरून तर महायुतीतल्याच नेत्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. असे असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी मोठं आणि खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ते एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक मानले जातात.
गेल्या दहा महिन्यांपासून सर्वच आमदारांना कोणताही निधी मिळत नाहीये. काही लोकप्रिय योजनांमुळे राज्य सरकार सध्या अडचणींतून चालले आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय की लवकरच आपली परिस्थिती सुधारेल आणि राज्याचीही परिस्थिती पुर्ववत होईल, अशी कबुलीच संजय गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.
तर संजय गायकवाड यांच्या याच प्रतिक्रियेवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी संजय गायकवाड यांचा दावा फेटाळला आहे. सर्वच आमदारांना निधी दिला जात आहे. माझ्या विभागाचे मला विचाराल तर एसटी डेपो, एसटी स्टँड किंवा इतरही काही गोष्टींसाठी निधीची व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे आमदारांनी संबंधित वक्तव्यक केलेलं असलं ती माझ्यातरी निधीची टंचाई निदर्शनास आलेली नाही, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय गायकवाड यांनी याआधीही बरीच वादग्रस्त विधानं केलेली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यातील पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच आमदारांनी जपून बोलावे, असाही सल्ला दिला होता. त्यानंतर आता गायकवाड यांनी आमदारांना 10 महिन्यांपासून निधी मिळाला नसल्याचा दावा केल्यामुळे एकनाथ शिंदे तसेच फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.