भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना अवघ्या 6 धावांनी जिंकला. भारताने या विजयासह इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. कर्णधार म्हणून शुबमन गिल याची ही पहिलीच कसोटी मालिका होती. शुबमनने या मालिकेत स्वत:ला फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही सिद्ध केलं. शुबमनने त्याच्या नेतृत्वात आणि अनुभवी खेळाडूंशिवाय मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. शुबमनने या मालिकेनंतर आणखी एक विजय मिळवला आहे. शुबमनने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला पछाडत मोठा बहुमान मिळवला आहे.
भारताचा कर्णधार शुबमन गिल हा इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याच्यापेक्षा सरस असल्याचं स्वत: आयसीसीने जाहीर केलंय. आयसीसीने जुलै 2025 या महिन्यातील प्लेअर ऑफ द मन्थ पुरस्कार विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली आहे. आयसीसीने बेन स्टोक्स, शुबमन गिल आणि दक्षिण आफ्रिकेचा ऑलराउंडर आणि कर्णधार वियान मुल्डर या तिघांना पुरस्कारासाठी नामांकन दिलं होतं. मात्र मुख्य लढाई ही गिल विरुद्ध स्टोक्स यांच्यात होती. गिलने इथेही सरशी मारली आणि हा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. गिलची आयसीसीचा हा पुरस्कार जिंकण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
शुबमनचा कसोटी कर्णधार झाल्यानंतर हा पुरस्कार जिंकण्याची पहिली तर एकूण चौथी वेळ ठरली आहे. शुबमनने याआधी फेब्रुवारी महिन्यात हा पुरस्कार पटकावला होता. तर त्याआधी शुबमनने 2023 साली सप्टेंबर आणि जानेवारी महिन्यात या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली होती.
आयसीली एका महिन्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 3 फलंदाजांना या पुरस्कारासाठी नामांकन देतं. त्यानंतर क्रिकेट चाहते ऑनलाईन आपल्या आवडत्या खेळाडूला व्होट देऊ शकतात. त्यानंतर आयसीसी संबंधित खेळाडूला मिळालेली मतं आणि त्याच्या कामगिरीच्या आधारावर विजेता निश्चित करते.
शुबमन जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध एकूण 3 सामने खेळला. शुबमनने या दरम्यान 3 सामन्यांमध्ये 94.50 च्या ऐतिहासिक सरासरीने 550 पेक्षा अधिक धावा केल्या. शुबमनने एकूण 567 धावा केल्या होत्या. तसेच बेन स्टोक्स याने 3 सामन्यांमध्ये 251 धावा करण्यासह 12 विकेट्सही घेतल्या होत्या. तर वियान मुल्डर याने झिंबाब्वे विरुद्ध 2 सामन्यांमध्ये 531 धावा केल्या. तसेच 7 विकेट्सही मिळवल्या होत्या. मात्र शुबमनने या दोघांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला.