Solapur Drug Case : सहा कोटींचे मेफेड्रिन प्रकरण; न्यायालयाने दोघांचा जामीन फेटाळला
esakal August 13, 2025 02:45 AM

सोलापूर : सप्टेंबर २०२३ मध्ये मोहोळ तालुक्यातील देवडी पाटीजवळ दत्तात्रय घोडके, गणेश घोडके या दोघांना पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याजवळ सहा कोटी दोन लाखांचे तीन किलो १० ग्रॅम मेफेड्रिन (एमडी ड्रग्ज) सापडले होते. ११ आरोपींकडून तब्बल सव्वानऊ कोटींचे एमडी ड्रग्ज पकडले होते. यातील संशयित आरोपी किरणकुमार सूर्यकांत बिराजदार पाटील (रा. बिदर, कर्नाटक) व सनी अरुण पगारे (रा. नाशिक) यांनी जामिनासाठी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात केलेला जामिनाचा अर्ज जिल्हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने फेटाळला आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी किरणकुमार याच्याकडे चौकशी केली. त्याने कार (टीएस १५, इपी ०१११) ही गाडी ड्रग्ज तस्करी व वाहतुकीसाठी वापरल्याची बाब समोर आली होती. तर सनी हा ते अंमली पदार्थासाठी सोलापुरात आला होता. संशयितांविरुद्ध आणखी दोन गुन्हे न्यायप्रविष्ट असून संशयितांना बाहेर सोडल्यास ते पळून जाण्याची शक्यता असून ते पुन्हा ड्रग्जची खरेदी-विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केला. तो ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. कटारिया यांनी दोन्ही संशयितांचा जामीन फेटाळला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.