आयसीआयसीआय बँकेनंतर एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना धक्का, किमान शिल्लक रक्कम वाढवली
Marathi August 13, 2025 08:25 PM

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेनं बचत खात्यातील किमान सरासरी शिल्लक रकमेसंदर्भातील नियम बदलल्यानंतर एचडीएफसी बँकेनं देखील किमान सरासरी शिल्लक रकमेत वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेनं शहरी भागातील बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रक्कम 10000 रुपयांवरुन 25000 रुपये  करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 1 ऑगस्ट 2025 तारखेनंतर उघडल्या जाणाऱ्या बँक खात्यांसाठी लागू असेल.

आयसीआयसीआय बँकेनं काहीच दिवसांपूर्वी किमान सरासरी शिल्लक रक्कम 10000 रुपयांवरुन 50000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर एचडीएफसी बँकेनं हा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आयसीआयसीआय बँकेच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.

एचडीएफसी बँकेच्या अधिकाऱ्यांकडून जे खातेदार  किमान सरासरी शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्यात अपयशी ठरतील त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल. किमान सरासरी शिल्लक रक्कम वाढवल्यानं सेवेची गुणवत्ता वाढेल आणि गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा एचडीएफसी बँकेला आहे.

एकीकडे खासगी क्षेत्रातील बँका किमान शिल्लक रक्कम वाढवत असताना सार्वजनिक क्षेत्रातील बँका मात्र किमान शिल्लक रकमेचा नियम शिथील करत आहेत. सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियानं बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्यासंदर्भातील नियम शिथील केला. स्टेट बँक ऑफ इंडियानं हा बदल 2020 पासून लागू केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियासह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्यासंदर्भातील नियम शिथील करत कोणतंही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये इंडियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँकेचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी सोमवारी किमान शिल्लक रक्कम ठेवण्याचा निर्णय बँकांच्या अखत्यारित आहे, त्याचा आरबीआयसोबत संबंध नाही.

किमान शिल्लक रक्कम किती ठेवायचा या संदर्भातील निर्णय आरबीआयनं बँकांवर सोडलेला आहे. काही बँकांनी किमान शिल्लक रक्कम 10 हजार रुपये तर काही बँकांनी 2000 रुपये ठेवली आहे तर काही बँकांनी ते माफ केलं आहे. हा विषय आमच्या नियमनाच्या अखत्यारित येत नाही, असं संजय म्हलोत्रा म्हणाले.

आयसीआयसीआय बँकेनं मेट्रो मधील बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कम 10 हजारांवरुन 50 हजार रुपये केलं आहे.जे खातेदार नियमांचं पालन करणार नाहीत त्यांना 6 टक्के किंवा 500 रुपये जे कमी असेल ते शुल्क आकारलं जाईल.

दरम्यान, खासगी बँकांनी बचत खात्यासंदर्भातील किमान शिल्लक रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबत ग्राहकांची प्रतिक्रिया कशी येते ते पाहावं लागेल.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.