पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात आंदोलन
घाटकोपर, ता. १३ (बातमीदार) ः मुंबई महापालिका रुग्णालयांत रुग्णांना न मिळणारी सुविधा, अपुरे बेड, डॉक्टर आणि स्टाफची कमतरता या अभावामुळे रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. याविरोधात विक्रोळीतील समाजसेवक डॉ. योगेश भालेराव यांनी पालिका आरोग्य व्यवस्थेची प्रतीकात्मक तिरडी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलनाआधीच डॉ. योगेश भालेराव यांना विक्रोळी पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले. विक्रोळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ते स्मशानभूमीपर्यंत ही तिरडी यात्रा काढण्यात येणार होती. समाजसेवक डॉ. योगेश भालेराव यांनी सांगितले की, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाॅर्ड व आयसीसीयूमध्ये तब्बल १५ हजारांच्या आसपास बेड असूनही आरोग्य सुविधा सुरळीत मिळत नाही. रुग्णांना बेडअभावी जमिनीवर उपचार घ्यावे लागतात, असा आरोप त्यांनी केला.