प्रवाशांच्या मागण्यांकडे
कोकण रेल्वेचा कानाडोळा
खेड स्थानकावर उपोषण; रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरू करा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ : उच्चस्तरीय मान्यता नसतानाही कोकण रेल्वेच्या अखत्यारितील मागण्या रेल्वे प्रशासनाने मान्य करत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी खेड रेल्वेस्थानकावरील उपोषण रद्द करणार नाही, असे जल फाउंडेशन कोकण विभागाचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले.
ते म्हणाले, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून फक्त आश्वासनं ऐकत आलो आहोत; पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी रेल्वेस्थानकावर उपोषण करण्याचा ठाम निर्णय केला आहे. मुंबई–चिपळूणदरम्यान कायमस्वरूपी दैनिक गाडी सुरू करणे आवश्यक आहे. खेडसह कोकणातील प्रमुख स्थानकांना वाढीव थांबा दिला, तर त्याचा फायदा कोकण रेल्वेलाच होईल. रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिव्यापर्यंत चालवली जाते. ती पुन्हा दादरपर्यंत सुरू करा तसेच आरक्षण कोटा वाढवणे आणि दिवसाच्या गाड्यांना पुरेसे सीटिंग डबे उपलब्ध करून देणे या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार आहे.
चौकट
प्रवाशांची कोंडी
खेड रेल्वेस्थानकातून दिवसाला दोन हजार प्रवासी प्रवास करतात, तरीही आरक्षण कोटा अत्यल्प आहे. विशेष गाड्यांवर दुप्पट भाडे, तत्काळ दर आणि सीटिंग डब्यांचा अभाव यामुळे प्रवाशांची मोठी कोंडी होत आहे, असे प्रवाशांचे मत आहे.