Beed Jail: गांजासाठी भांडणाऱ्या चारही कैद्यांचे स्थलांतर; पोलिसांनी मागविले बीड कारागृहातील फुटेज
esakal August 13, 2025 03:45 AM

बीड : कारागृहात गांजाच्या वाटणीसाठी हाणामारी करणाऱ्या तसेच व अधिकाऱ्यांना शिव्या देणाऱ्या कैद्यांचे आता वेगवेगळ्या कारागृहात स्थलांतर करण्यात आले आहे. यातील सतीश भोसले ऊर्फ खोक्या याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, गांजा कारागृहात कसा आला, याचा तपास करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मागणी पोलिसांनी केली आहे.

सतीश ऊर्फ खोक्या भोसले, श्याम ऊर्फ बाळू उत्तम पवार, वसीम खान अफजलखान पठाण व यमराज धरमसिंग राठोड या चौघांनी आपल्या हस्तकांमार्फत गांजा उपलब्ध केला. आणलेल्या गांजाची वाटणी करण्यासाठी या चौघांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारीही झाली.

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही या चौघांनी धमकी देत शिवीगाळ केली. याप्रकरणी कारागृहाचे सुभेदार बलभीम चिंचाणे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

दरम्यान, या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयाला पत्र दिले आहे. तसेच, गांजा कशा पद्धतीने उपलब्ध झाला, याचा तपास करण्यासाठी कारागृहाचे सीसीटीव्ही फुटेजही मागविले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मोरे यांच्याकडून पोलिस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

Student Protest: सेना महाविद्यालयात विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरक्षेच्या कारणास्तव केली रवानगी

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव आता कारागृह प्रशासनाने या चारही कैद्यांची वेगवेगळ्या कारागृहांत रवानगी केली आहे. यात सतीश भोसले ऊर्फ खोक्या याची छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात, तर श्याम उर्फ बाळू उत्तम पवार याची जालना जिल्हा कारागृहात, वसीम खान अफजलखान पठाणची परभणी कारागृहात आणि यमराज धरमसिंग राठोड याचे धाराशिव जिल्हा कारागृहात स्थलांतर केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.