Thane News: डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण, नागरिकांकडून कौतुकाचे बॅनर लावत प्रशासनावर टीका
esakal August 13, 2025 08:45 PM

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड, नवापाडा रस्त्याची अक्षरशः खड्डयांनी चाळण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर देखील या रस्त्यावरील खड्डे हे बुजविण्यात आले नाही. यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी अखेर सुभाष रोड परिसरात आम्हाला असा सुंदर रस्ता दिल्याबद्दल खासदार, आमदार, नगरसेवक तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे शतशः आभार मानले आहेत. तशा आशयाचे बॅनर या प्रभागात लावण्यात आला असून हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

यंदा पावसास लवकर सुरुवात झाल्याने मे महिन्यापासूनच खड्ड्यांचा त्रास नागरिक, वाहन चालक यांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची सुरु असलेली कॉंक्रीटीकरणाची कामे, महानगर गॅस वाहिनी, गटारांची बांधणी, सेवावाहिन्या, अमृत योजनेची कामे यामुळे रस्त्यांची दुरावस्था तसेच कोंडीच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत होते. पावसाळा सुरु होण्याआधी ही कामे आहेत तेवढी पूर्ण करुन रस्ते सुधारणे हे पालिका प्रशासनाचे काम आहे. मात्र पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले.

यंदा मे महिन्यातच पाऊस सुरु झाला, यामुळे केवळ भराव भरून रस्ते आहेत त्याच स्थितीत सोडून देण्यात आले. शहरातील मुख्य रस्ते हे कॉंक्रीटीकरणचे झाले असले तरी डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड व पश्चिमेतील सुभाष रोडचे काम अद्याप झालेले नाही. या डांबरी रस्त्यांची प्रत्येक पावसाळ्यात खड्डे पडून चाळण होते. याविरोधात गेले अनेक वर्षे मंत्री, कलाकार, नागरीक हे आवाज उठवित आहेत. मात्र पालिका प्रशासन मात्र ढिम्म आहे.

यंदाच्या पावसाळ्यात देखील या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मे तसेच जून महिन्यात रस्त्यावर खड्डे पडून ते खड्डे मोठे मोठे होत गेले. जुलै महिन्यात संतोष मिरकुटे या रिक्षाचालकाने स्वतः पुढाकार घेत सुभाष रोडवरील खड्ड्यांत डेब्रिज आणून टाकले आणि खड्डे बुजविले. आगामी पालिका निवडणूका लक्षात घेता विरोधी पक्षांनी यावर आपली पोळी भाजून घेतली. मनसे, शिवसेना ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधींनी येथील खड्डयांत वृक्षारोपण करुन आंदोलन केले.

राजकीय पक्षांच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाला या रस्त्यावरील खड्ड्यांची जाणीव झाली. ऑगस्ट महिन्यात दहिहंडी, गणेशोत्सव असल्याने पालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले, खड्ड्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरु केला. पावसाने देखील दोन आठवडे उघडीप दिल्याने आता तरी रस्त्यांची स्थिती सुधारेल असे वाटत होते. मात्र या दिवसांत पालिका प्रशासनाने केवळ मोजकेच खड्डे भरुन नेहमी प्रमाणे दिखावा कारवाई केली. सुभाष रोडवरील खड्डे मात्र कोणालाच दिसले नाहीत अशीच परिस्थिती या रस्त्याची दिसून आली. या रस्त्यावर खड्डे आहेत हे माहित असूनही तेथील खड्डे बुजविले गेले नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आता आपला आवाज उठविला आहे.

या परिसरात त्रस्त नागरिक म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर लिहिलेल्या आशयाने सर्वांचे लक्ष वेधले असून डोंबिवलीकरांनी नागरिकांना सवाल करत प्रशासनाला देखील जाब विचारला आहे. हीच का आपल्या मतांची किंमत म्हणत डोंबिवलीकरांनी सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल साद घातली आहे. त्यानंतर आमचे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असा सुंदर रस्ता आम्हाला दिल्याबद्दल शतशः आभार असे म्हणत प्रशासनाला जाब विचारला आहे.

निवडणूक काळामध्ये चिरीमिरी घेऊन आणि भूलथापांना, आमिषांना पुन्हा बळी पडू नका असा सल्ला नागरिकांना या बॅनरमधून देण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 58, 59 आपले स्थानिक नगरसेवक असेही त्यात लिहिण्यात आले आहे.

तसेच खाली दिलेल्या टिप ची तर नागरिकांनी कौतुक केले आहे. पालिका प्रशासन किंवा सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असे काही बॅनर दिसले की रातोरात तो काढून टाकतात. सुभाष रोड परिसरात असाच एक बॅनर या आधी ही लागला होता. मात्र तो फाडून फेरिवाल्यांच्या छत्री आड तो झाकून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्याने लागलेल्या बॅनरवर टिप देण्यात आली आहे की, नार्मद बनून हा बॅनर काढू किंवा फाढू नका, तर रस्ता चांगला करुन सिद्ध करा असा सल्ला देण्यात आला आहे.

केडीएमसीत प्रशासकीय राजवट लागू आहे. पालिका अधिकाऱ्यांना डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड हा एकच रस्ता खड्डे पडून खराब असल्याची माहिती आहे. मात्र तो एक रस्ताही नीट करणे त्यांना एवढ्या दिवसांत जमलेले नसल्याने आता या बॅनरकडे तरी पाहून पालिका प्रशासनाला जाग येते का पहावे लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.