वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यात अविस्मरणीय अशी कामगिरी केली. भारताने यजमान इंग्लंड वूमन्स टीमला टी 20I आणि वनडे या दोन्ही सीरिजमध्ये पाणी पाजलं. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात या दोन्ही मालिका जिंकल्या. त्यानंतर वूमन्स इंडिया ए टीम राधा यादव हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. वूमन्स इंडिया ए टीमला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजयी झंझावात कायम राखता आला नाही. वूमन्स इंडिया ए टीमला क्लिन स्वीपचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया वूमन्स 3 सामन्यांची टी 20 मालिका 3-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली आणि भारताचा धुव्वा उडवला. आता त्यानंतर उभयसंघात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. भारताकडे या मालिकेत विजय मिळवून कांगारुंचा हिशोब करण्याची सुवर्णसंधी आहे.
ऑस्ट्रेलिया ए वूमन्स टीमने 7 ऑगस्टला भारतावर 13 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिला सामना गमावल्याने भारतासाठी दुसरा सामना हा करो या मरो असा होता. मात्र 9 ऑगस्टला झालेल्या सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताचा 114 धावांनी धुव्वा उडवला.ऑस्ट्रेलियाने यासह मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर भारताकडे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून लाज राखण्याची संधी होती. मात्र 10 ऑगस्टला भारताचा अवघ्या 4 धावांनी पराभव झाला आणि ऑस्ट्रेलियाने 3-0 ने क्लिन स्वीप केलं.
त्यानंतर आता 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान नॉर्थ्समध्ये वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. आता या मालिकेत महिला ब्रिगेड कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध वूमन्स इंडिया ए, पहिला सामना, 13 ऑगस्ट, नॉर्थ्स
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध वूमन्स इंडिया ए, दुसरा सामना, 15 ऑगस्ट, नॉर्थ्स
वूमन्स ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध वूमन्स इंडिया ए, तिसरा सामना, 17 ऑगस्ट, नॉर्थ्स
3 वनडे मॅचसाठी वूमन्स इंडिया ए टीम : राधा यादव (कॅप्टन), मिन्नू मणी (उपकर्णधार), शफाली वर्मा, तेजल हसबनीस, रघवी बिस्त, तनुश्री सरकार, उमा चेत्री (विकेटकीपर), प्रिया मिश्रा (फिटनेसवर अवलंबून), तनुजा कंवर, नंदिनी कश्यप (विकेटकीपर), धारा गुज्जर, जोशिता व्हीजे, शबमन शकील, साईमा ठाकोर आणि तितास साधु.