मांसविक्री बंदी योग्य की अयोग्य, अजितदादांच्या भूमिकेमुळे नवा पेच; काय म्हणाले?
Tv9 Marathi August 13, 2025 10:45 AM

राज्यातील विविध ठिकाणी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंधी घालण्याची निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली, नागपूर, मालेगाव, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. मात्र महापालिकांच्या या निर्णयाचा अनेक लोकांनी विरोध केला आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार आज पत्रकारांशी संवाध साधत होते. यावेळी त्यांना मांसविक्ररीवरील बंदीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मी पण ती बातमी टीव्हीवर पाहिली. आता खरं तर श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळी अशा प्रकराची बंदी घातली जाते. राज्यात काही जण शाकाहारी, काही मांसाहारी आहेत. कोकणात साधी भाजी करताना नॉनव्हेज असते, तो त्यांचा आहार आहे.

बंदी घालणं उचित नाही

पुढे बोलताना अजित पवार यांनी, ‘अशी बंदी घालणं उचित नाही. महत्त्वाच्या शहरात अनेक-जाती धर्माचे लोकं राहतात. भावनिक मुद्दा असेल तर लोकं ते स्वीकारतात करतात. मात्र 26 जानेवारी 1 ऑगस्टला मांसाहारावर बंदी घालायला लागले तर अवघडच आहे. हे माझं मत असे आहे, असं म्हणत मांसविक्रीच्या निर्णयाला विरोध केला आहे.

राज्य सरकारसमोर पेच…

अजित पवारांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मांस विक्रीवरील बंदी उठवायची की तशीच ठेवायची असा पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर उभा राहिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे.

खाटीक समाजाचा इशारा

कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्डे आहेत ,स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी आहे,पाणी समस्या आहे, अशी बरीच कामे कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखे आहेत मात्र ती केली जात नाहीत 15 ऑगस्ट निमित्त चिकन व मटन विक्री बंद ठेवून ते आमच्या पोटावर पाय देतायत. त्यामुळे महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा येत्या 15 ऑगस्टला महापालिका मुख्यालयाच्या गेटवरच मटन विक्री करण्यात येईल असा इशारा खाटीक समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.