Nashik Election News : भाजपच्या भरवशावर राहू नका, स्वबळावर लढण्याची तयारी करा; शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना निर्देश
esakal August 13, 2025 10:45 AM

नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून महायुतीचे गाजर दाखविले जात असले, तरी दुसरीकडे स्वबळाची भाषा बोलली जात आहे. कार्यकर्त्यांनाही तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या भरवशावर राहण्यापेक्षा स्वबळाची तयारी करावी, असा सल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिला.

शिवसेनेतर्फे उत्तर महाराष्ट्रातील निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघटनात्मक आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उपनेते राहुल शेवाळे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे यांच्या समितीच्या उपस्थितीत बैठक झाली. नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर येथील सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.

महापालिका निवडणुकीत भाजपबरोबर युती होईल की नाही? याबाबत संशय व्यक्त करताना पक्षाच्या वरिष्ठांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. भाजपकडून महायुती म्हणून निवडणूक लढविली जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात स्वबळाची तयारी सुरू असल्याची खदखद व्यक्त करण्यात आली. भाजपची तयारी पाहता महायुती म्हणून निवडणूक लढविली जाणार नसल्याचे मत सर्वच पदाधिकाऱ्यांनी मांडले.

Ram Shinde: जलद-सुखद प्रवासाची सुविधा मिळणार: सभापती राम शिंदे; वंदे भारत एक्स्प्रेसचे अहिल्यानगर रेल्वे स्थानकात स्वागत

‘राष्ट्रवादी’शी चाचपणी करा

महायुतीसंदर्भातभाजपच्या भरवशावर राहू नये, भले राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करा, असे पदाधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले. स्वतंत्र लढायची तयारी करा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीबाबत चाचपणी करण्याचा आग्रह धुळे, अहिल्यानगर, जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरला. एकीकडे पदाधिकारी आक्रमक होत असताना दुसरीकडे पदाधिकाऱ्यांची भूमिका वरिष्ठांना कळविण्याचे आश्वासन देण्यात आले. सभासद वाढवा, सभासद वाढले तरच स्वबळावर लढता येईल, हवेत गोळीबार नको अशा कानपिचक्या समितीने देताना मतदारसंघाचे व्यवस्थित गणित तयार करा, तुमची ताकद असेल तर भाजपवाले तुमच्याकडे युतीसाठी येतील, असा सल्ला दिला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.