Sanjay Raut : बाजीराव पेशवे मांसाहार करायचे, 15 ऑगस्टला मांसमच्छी विक्रीच्या बंदीवरुन संजय राऊत आक्रमक
Tv9 Marathi August 13, 2025 06:45 PM

“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलय का? मुंबईसारख्या, पुण्यासारख्या शहरात अनेक सोसायट्यात डोंबिवली सारख्या शहरात सुद्धा मांसमच्छी खाणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. घर दिलं जात नाही. याच्यावर संघर्ष सुरुच आहे. आता 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी महानगरपालिका फतवा काढते. त्यादिवशी मांसमच्छी विक्रीवर बंदी आणते” त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. “15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्यदिन आहे. लोकांनी आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. धार्मिक उत्सव नाही, शौर्याचा दिवस आहे. या दिवशी आम्हाला विजय मिळाला. ते स्वातंत्र्य नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांमुळे मिळालेलं नाही. या स्वातंत्र्यासाठी रक्तपात, हिंसाचार झाला. त्यात भाजप आत्ताची विचारसरणी आहे, मासं मच्छी न खाणाऱ्यांची ते कुठेही नव्हते” अशी टीका राऊत यांनी केली.

“तुमच्याकडे मागणी कोणी केली? स्वातंत्र्यदिनी मांसाहार वर्ज्य हे काय नवीन थोतांड आहे. या थोतांडाचे जनक कोण आहे? फडणवीस म्हणतात काँग्रेसच्या काळात, काँग्रेस सोडा, तुमचं बोला. तुमच्या स्वप्नात, छातीवर काँग्रेस बसलेली आहे. आम्ही बसलेलो आहोत. काहीही विचारा, काँग्रेसच्या काळात, नेहरुंच्या काळात. महाराष्ट्राला नपुंसक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले की, मावळे काय वरणभात, तूप खाऊन लढत होते का? ते मांसाहार करत होते. बाजीराव पेशवे मांसाहार करायचे त्या शिवाय युद्धावर लढता येत नाही. सीमेवर सैन्याला मांसाहार करावा लागतो. वरण, भात, तूप, पोळी खाऊन श्रीखंड-पुरी खाऊन युद्ध लढता येत नाही तुम्ही महाराष्ट्राला नपुंसक करताय, नार्मद बनवताय हे फतवे मागे घ्या फडणवीस” असं राऊत म्हणाले.

शरद पवारांच्या काळात निर्णय झाला त्यावर काय म्हणाले?

“मराठी माणसाचे संस्कार, संस्कृती खतम करताय तुम्ही. स्वातंत्र्यदिनी मांसाहार करायचा नाही, तुम्ही नका खाऊ. तुम्ही लपून खाताय, मग लोकांवर बंदी का लादता? हा देश आहे की बंदीशाळा? हे बंदीराष्ट्र झालं आहे का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. अजित पवार म्हणतात मासंवक्रीवर बंदी घालणं योग्य नाही, भाजपचे लोक शरद पवार मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला. या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

हे थोतांड आहे

“शरद पवार मुख्यमंत्रीपदी राहून किती काळ लोटला. शरद पवार शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले हे फडणवीस यांना माहिती आहे का?. मनोहर जोशी 25-30 वर्षापूर्वी मुख्यमंत्री होते. त्याआधी पवारसाहेब होते. तुम्ही कोणते अध्यादेश बाहेर काढताय, तुमच्याकडे कोणी मागणी केलीय का? शरद पवारांच्या काळात अध्यादेश निघाला की नाही, हे मला माहित नाही. पण मांस-मच्छी विक्रीवर बंदी घातली असेल, तर मला आश्चर्य वाटेल. असं काही घडलेलं नाही हे थोतांड आहे” असं संजय राऊत म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.