पिकअप कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये सात लहान मुलं आणि दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघातात भाविकांनी प्राण गमावले आहेत. ते मंदिरात दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी हा भयानक अपघात झाला. राजस्थानच्या दौसामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. अपघात इतका भयानक होता की, अकरा जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी लोक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व भाविक पिकअप व्हॅनमध्ये होते. या पिकअप व्हॅनची ट्रकसोबत जोरदार टक्कर झाली. गंभीर जखमींना जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अन्य जखमींवर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व भाविक उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती आहे. खाटू श्याम जी आणि सालासर बालाजीच दर्शन करुन हे भाविक परतीच्या मार्गावर असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.
लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अपघात इतका भयानक होता की, पिकअप कारचा चेंदामेंदा झालाय. आम्हाला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला. अचानक लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्या. आम्ही पाहिलं की, पिकअप कार आणि ट्रकची टक्कर झालीय. लोक वेदनेने विव्हळत होते. मदतीची मागणी करत होते. आम्ही लगेच या अपघाताबद्दल पोलिसांना कळवलं. पिकअपमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. त्यानंतर रुग्णावाहिकेतून जखमींना रुग्णालयात पोहोचलव असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
अपघाताबद्दल पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलीस म्हणाले की, “आम्ही हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय की चुकी कोणाची आहे. आमच्या टीमने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलय” 11 जणांचा या भीषण अपघातात मृत्यू झालाय. 15 जखमींपैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तात्काळ सवाई मानसिंह रुग्णालयात पोहोचवलं. आम्ही अपघाताच्या कारणांची चौकशी करत आहोत, असं पोलिसांनी सांगितलं. अपघातग्रस्त सर्व लोक उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. जखमींच्या नातेवाईकांना कळवण्यात आलं आहे. मृतदेह शवागरात ठेवले आहेत.