बहिणीच्या सासरी गेली, भावोजीला बाथरुममध्ये कोंडलं अन् पुरुषाचा वेश करत… वसईत नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi August 13, 2025 06:45 PM

गेल्या काही दिवसांपासून अनेक लोक हे आर्थिक विवंचनेत सापडल्याचे पाहायला मिळत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी काही लोक चोरीचा मार्ग निवडत असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. त्यातच वसईत दीड कोटी रुपयांच्या चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात झालेल्या मोठ्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी एका २७ वर्षीय अविवाहित तरुणीने आपल्या सख्ख्या बहिणीच्या सासरच्या घरी चोरी केली. ही घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली. यावेळी चोरीला गेलेले दीड कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले.

वसईतील ६६ वर्षीय उदय भानुशाली यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली. आरोपी ज्योती भानुशाली ही उदय भानुशाली यांच्या मोठ्या सुनेची सख्खी बहीण आहे. ज्योतीने चोरी करण्यासाठी एक अनोखी युक्ती वापरली. तिने पुरुषाचा वेष धारण केला आणि घरात शिरली. घरात आल्यावर तिने उदय भानुशाली यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवले. त्यानंतर तिने घरातील कपाटात ठेवलेले दीड कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. या चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यांना एका पुरुषाच्या वेषात असलेल्या व्यक्तीवर संशय आला. या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक तपास केला. तेव्हा ही व्यक्ती पुरुष नसून एक तरुणी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी ज्योती भानुशालीला गुजरातमध्ये जाऊन अवघ्या १२ तासांत अटक केली. पोलिसांच्या चौकशीत ज्योतीने कबूल केले की तिला शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा झाला होता. हा तोटा भरून काढण्यासाठी तिने हे पाऊल उचलले.

याआधीही तिने आपल्या वडिलांच्या घरातून ३० लाख रुपयांचे दागिने चोरून ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते, पण त्यातही तिला नुकसान झाले. त्यामुळे तिने पुन्हा मोठ्या चोरीचा कट रचला. पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले दीड कोटी रुपयांचे सर्व दागिने हस्तगत केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कुटुंब आणि परिसराला धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्जबाजारी प्रियकराला मदत करण्यासाठी चोरी

तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेमाच्या नावाखाली एका १९ वर्षीय तरुणीने आपल्या कर्जबाजारी प्रियकराला मदत करण्यासाठी चक्क आईचे ११ तोळे दागिने आणि १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड चोरल्याची घटना समोर आली. ही घटना भारतनगर येथील एका सेवानिवृत्त महिलेच्या घरात घडली. रक्षाबंधनासाठी मुलाने आईकडे सोन्याची अंगठी मागितल्यावर ही चोरी उघडकीस आली. महिलेने कपाटात पाहिले असता दागिन्यांचे डबे आणि रोकड गायब असल्याचे दिसून आले. चौकशी केली असता, तरुणीने दोन महिन्यांपूर्वीच दागिने प्रियकराच्या स्वाधीन केल्याचे सांगितले. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

यानंतर बेगमपुरा पोलिसांनी मंगेश विलास पंडित आणि त्याचा मित्र कुणाल केरकर यांना अटक केली आहे. आरोपी मंगेशने पैशाची गरज असल्याचे सांगून तरुणीकडे दागिने मागितले होते. प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीने दोरी आणि बादलीच्या मदतीने दागिने आणि रोकड मंगेशला दिली. त्यानंतर मंगेश आणि त्याच्या मित्राने ते पैसे घेतले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, दागिन्यांबाबत अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.