15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णय काही महापालिकांनी घेतला असून त्यामुळे राज्यभरात आता नवा वाद पेटला आहे. अनेकांना मांस-मटण विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पटलेला नसून त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं असून विविध प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. विरोधी पक्षांनीही या मुद्यावरून सरकारला धारेवर धरलं असून जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांसारख्या नेत्यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने याविषयी सर्वप्रथम आदेश जारी करत 15 ऑगस्टच्या दिवशी मांस-मटण विक्रीवर बंदी असल्याचे जाहीर केले होते, तिथूनच हा वाद सुरू झाला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवत मी तर त्याच दिवशी मांस-मटण खाणार अशी आक्रमक भूमिकाच घेतली.
तर आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे नेते, खासादर संजय राऊत यांनीही सरकारवर ताशेरे ओढले. स्वातंत्र्यदिनी मांसाहार करायचा नाही, तुम्ही नका खाऊ. तुम्ही लपून खाताय, मग लोकांवर बंदी का लादता? हा देश आहे की बंदीशाळा? हे बंदीराष्ट्र झालं आहे का?” असा सवालच उपस्थित केला. तर याप्रकरणी सरकारला घरचाच आहेरही मिळाल्याचे दिसून आले. महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत रोखठोक भूमिका मांडली. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मांस विक्रीवर बंदीचा हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत एखाद्या व्यक्तीच्या आहारावर अशा प्रकारे बंदी घालणे योग्य नसल्याचं खुद्द उपमुख्यमंत्रीच म्हणालेत.
त्यामुळे स्वातंत्र्य मिळां त्याच दिवशी कोणी काय खाव या स्वातंत्र्यावर घाला घालत ज्या 5 महापालिकांनी हा फतवा काढला, 15 ऑगस्टला मांस-मटण विक्रीवर बंदी घातली. त्या निर्णयामुळे मोठा गदारोळ निर्माण होताना दिसतोय.
15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कोणत्या महापालिकांनी मांसाहार विक्रीवर बंदी घातली ते जाणून घेऊया
नागपूर महापालिकेने 15 ऑगस्ट आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीला चिकन मटण दुकान आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. दरम्यान 15 ऑगस्टला तर दुकान बंद राहतात मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुद्धा दुकान बंदचा आदेश महापालिकेने काढला असेल तर आम्ही बंद ठेऊ, अशी भूमिका नागपुरातील चिकन विक्रेत्यांनी घेतली आहे. सध्या श्रावण मास सुरू आहे त्यामुळे व्यवसाय कमीच आहे, त्यात एक दिवस बंद ठेवलं तर व्यवसायावर परिणाम होईल मात्र प्रशासनाच्या आदेशाच आम्ही पालन करणार असं ते म्हणाले. एक दिवस दुकान बंद ठेवायला हरकत नाही अशीच भूमिका ग्राहकांनीही घेतल्याचें दिसून आलं.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवलीत चिकन, मटण शॉप, कत्तलखाने बंद राहणार, पालिकेने घेतला महत्वाचा निर्णय
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. येत्या 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व चिकन, मटण दुकाने, कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले. 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 15 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोणताही प्राणी कत्तल करू नये किंवा मांस विक्री करू नये, असे आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ नुसार कलम ३३४, ३३६ आणि ३७४ (अ) अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.
स्वातंत्र्यदिनाचा उत्सव उत्साहात आणि पवित्र वातावरणात साजरा करण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. या आदेशामुळे शहरातील सर्व खाटीक आणि परवानाधारक व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांचे कामकाज बंद ठेवावे लागणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन सर्व व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या महापालिकांनीही घातली बंदी
दरम्यान नागपूर आणि कल्याण डोंबिवली महापालिकेसह मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती येथील पालिकांनीही 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचं कारण देत मांस विक्रीवर बंदी घालत तसे निर्देश दिले आहेत.
जळगाव शहरात स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त उदय पाटील यांनी काढले आहेत.
आदेशात स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख न करता याच दिवशी श्रीकृष्ण जयंती असल्याने मांस विक्रीवर बंदी बाबत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आलं आहे. 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आणि 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी या दिवशी दोन मांसविक्री बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच या बंदी असलेल्या दिवशी व्यवसाय सुरू असल्यास संबंधितांवर पोलीस कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षात प्रथमच
स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंद राहणार असल्याने हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे
15 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्येही सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत. जन्माष्टमी तसेच जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वामुळे महापालिकेने हा बंदी आदेश लागू केला आहे. तसेच मालेगाव महानगरपालिकेनेही 15 ऑगस्ट, नंतर श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी तसेच 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, या दिवशी र्व मांस विक्रीची दुकाने, कत्तलखाने आणि यासंबंधित व्यवसाय पूर्ण दिवस बंद ठेवण्यात यावे, असा आदेश दिला आहे. धार्मिक सौहार्द, सार्वजनिक शांतता आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाचा यात अवलंब केला गेला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही मालेगाव महापालिकेने दिला आहे.