‘कौन बनेगा करोडपती’चा सतरावा सिझन नुकताच टेलिव्हिजनवर सुरू झाला आहे. 11 ऑगस्ट 2025 रोजी या सिझनचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. बॉलिवूडचे ‘महानायक’ अर्थात अभिनेता अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. या शोच्या पहिल्या एपिसोडला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. तर दुसऱ्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशातील बलिया इथला एक स्पर्धक हॉटसीटवर बसला होता. या स्पर्धकाने बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अचूक दिली होती. परंतु 12.50 लाख रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर तो देऊ शकला नव्हता.
‘केबीसी 17’च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये उत्तर प्रदेशच्या बलिया इथले इनकम टॅक्सचे उपायुक्त आशुतोष कुमार पांडे यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर 11 प्रश्नांची अचूक उत्तरं दिली. परंतु बाराव्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही, जो 12.50 लाख रुपयांसाठी होता.
काय होता प्रश्न?मार्क झकरबर्ग आणि सर्गेई ब्रिनसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी स्थापित केलेल्या कोणत्या पुरस्काराला विज्ञानाचा ऑस्कर म्हटलं जातं?
पर्यायA. एडिसन पुरस्कार
B. ब्रेकथ्रू पुरस्कार
C. मिलेनियम पुरस्कार
D. युरेका पुरस्कार
हा प्रश्न ऐकल्यानंतर आशुतोष कुमार पांडे हे उत्तराबद्दल विचार करू लागले. त्यांच्याकडे कोणतीच लाइफलाइन शिल्लक नव्हती. तरीसुद्धा त्यांनी जोखिम उचलत C पर्याय असं उत्तर दिलं. परंतु त्यांचं हे उत्तर चुकीचं होतं. त्यानंतर बिग बींनी या प्रश्नाचं नेमकं उत्तर सांगितलं. तो पर्याय B- ब्रेकथ्रू पुरस्कार असा होता. 12.50 लाख रुपयांच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिल्यामुळे आशुतोष कुमार पांडे यांना फक्त 5 लाख रुपये जिंकता आले.
‘कौन बनेगा करोडपती’या शोला 3 जुलै 2025 रोजी 25 वर्षे पूर्ण झाली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धकांना सात कोटी रुपये जिंकण्यासाठी 16 प्रश्नांची अचूक उत्तरं द्यावी लागणार आहेत. ‘केबीसी 17’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता टीव्हीवर प्रसारित होतो. या सिझनच्या खेळातील नियमांमध्ये काही बदल केल्याचा खुलासा बिग बींनी आधीच केला होता. अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक वर्षांपासून केबीसीचं सूत्रसंचालन करत आहेत. मध्यंतरीच्या एका सिझनसाठी शाहरुख खाननेही सूत्रसंचालन केलं होतं. परंतु तो सिझन फार गाजला नव्हता. केबीसीच्या आगामी एपिसोडमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ पार पाडणाऱ्या महिला अधिकारी उपस्थित राहणार आहेत.