नाशिक: आगामी २०२५-२८ या तीन वर्षांसाठी भाजप शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली असली तरी घराणेशाहीची स्पष्ट छाप दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजपला शंभर टक्के यश देणाऱ्या पंचवटी विभागाची पकड कार्यकारिणीवर दिसून येत आहे. कार्यकारिणीत सामाजिक समतोल राखण्यात आल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. यामध्ये माजी मंत्री बबन घोलप, सुनील बागूल विशेष निमंत्रित; तर बडगुजर यांना कार्यकारिणीपासून दूर ठेवले आहे.
कार्यकारिणीत महापालिकेसह शासनाच्या विविध विभागात ठेके घेणाऱ्या ठेकेदारांचादेखील समावेश करण्यात आल्याने पक्षांतर्गत वाद उफाळला आहे. विशेष म्हणजे ठेकेदारांचा समावेश करायचा की नाही या वरून आठवडाभर यादी लांबणीवर पडली. अखेरीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चेनंतर यादी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. पक्षाशी प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहिलेले काही चेहरे कार्यकारिणीत दिसतं असले तरी त्यांना बढतीची अपेक्षा होती.
अशी आहे मुख्य कार्यकारिणी
उपाध्यक्ष- सुनील फरांदे, ॲड. अजिंक्य साने, धनंजय माने, दिगंबर धुमाळ, रवी पाटील, सोनाली कुलकर्णी, रोहिणी दळवी, दीपक सानप, चित्रेश वस्पटे, संदीप लेनकर. सरचिटणीस - रश्मी हिरे- बेंडाळे, सुनील देसाई, अमित घुगे, ॲड. श्याम बडोदे. चिटणीस - नीलेश बोरा, राजेश आढाव, महेंद्र पाटील, सोनाली दाबक, कोषाध्यक्ष- आशिष नहार, युवा मोर्चा- प्रवीण भाटे, महिला मोर्चा- स्वाती भामरे, अनुसूचित जाती मोर्चा- राकेश दोंदे, आदिवासी मोर्चा- गोरक्षनाथ चौधरी, किसान मोर्चा- बापू पिंगळे, ओबीसी मोर्चा- प्रकाश चकोर, कामगार आघाडी- हेमंत नेहेते, उद्योग आघाडी-सतीश कोठारी, भटके-विमुक्त आघाडी- सिद्धेश्वर शिंदे आदी.
पक्षांतर्गत विरोधातून काळजी
शहर कार्यकारिणीत शिवसेना (उबाठा) तून नुकतेच प्रवेश केलेले सुनील बागूल व माजी मंत्री बबन घोलप यांना विशेष निमंत्रितांच्या यादीत बसविण्यात आले. त्याशिवाय माजी आमदार बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, माजी महापौर सतीश कुलकर्णी, विजय साने, प्रदीप पेशकार, माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, महेश हिरे, माजी आमदार निशिगंधा मोगल यांनाही आता थांबण्याचा एकप्रकारे सल्ला देत युवा वर्गाकडे सूत्रे दिल्याचे दिसून येते. शिवसेना (उबाठा) तून हकालपट्टी करण्यात आलेले व सध्या भाजपवासी झालेले सुधाकर बडगुजर यांना मात्र कार्यकारिणीमध्ये कुठेच स्थान देण्यात आले नाही. पक्षांतर्गत विरोधातून काळजी घेतल्याचे बोलले जात आहे.
Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाणप्रदेश नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार कार्यकारिणी तयार केली. कार्यकारिणीत सर्वसमावेशक आहे. संघटनात्मक बळकटीसाठी कार्यकारिणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
- सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप