-rat१२p३६.jpg -
२५N८४०१४
राजापूर ः दहीहंडीसाठी मानवी मनोरे उभारण्याचा सराव करताना आंबेवाडी येथील गोविंदा पथक.
---
राजापुरात गोविंदा पथकांचा सराव
श्रीकृष्णाची मूर्ती घडवण्याची लगबग : हंडीवर कलाकुसर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ : साऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा गोपाळकाला उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, त्याचे साऱ्यांना वेध लागले आहेत. या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात येणारी सर्वांत उंचीवरील मानाची हंडी फोडण्यासाठी गोपाळकाला पथकांकडून सध्या जोरदार सराव केला जात आहे. श्रीकृष्णाची मूर्ती घडवण्याची कारागिरांची लगबगही कार्यशाळांमध्ये दिसत आहे. यावर्षी गोपाळकाला पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. दहीहंडी उत्सवाला अवघ्या काही दिवसांचा कालावधी असल्याने सध्या या पथकांच्या सरावालाही वेग आला आहे.
शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या दहीहंड्या फोडण्यामध्ये गोपाळकाला पथकांमध्ये जोरदार चुरस मिळते. यामध्ये काही गोपाळकाला पथकेही मानवी मनोरे रचून उंचीवरील दहीहंड्या फोडण्यात माहीर म्हणून ओळखले जात आहेत.
दहीहंड्या फोडणाऱ्या गोपाळकाला पथकांच्या कौशल्याप्रमाणे दहीहंड्या तयार करणाऱ्या कारागिरांचे कौशल्यही चर्चेचा विषय बनते. कारागिरांनी हंडीवर काढलेली आकर्षक नक्षी, त्याची केलेली सजावट साऱ्यांचे लक्ष वेधून घेते. त्यातून काही विशिष्ट हंड्यांनाही लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे काही कारागीर सध्या हंड्यांची सजावट करणे, नक्षीकाम करणे आदींमध्ये गुंतले आहेत.
चौकट
अकरा पथकांमध्ये चुरस
यामध्ये शहरातील दिवटेवाडी येथील पवारमंडळी, आंबेवाडी, रूमडेवाडी, खडपेवाडी, चव्हाणवाडी आदी पथकांसह ग्रामीण भागातील दसूर, चिखले, भू, ओणी, आडीवरे, कणेरी आदी गोविंदापथकांचा यामध्ये समावेश आहे. या साऱ्या पथकांनी दहीहंड्या फोडण्यामध्ये तालुक्यात वर्चस्व राखण्यासाठी जोरदार कसून सराव केला आहे. या पथकांमधील सदस्यांकडून सायंकाळच्यावेळी सुरू होणारा सराव रात्री उशिरापर्यंत जोरदारपणे केला जात आहे.