भिगवण, ता. १३ : मुलीच्या लग्नात कन्यादान म्हणून दुचाकी, चारचाकी वाहन किंवा इतर भेट वस्तू न देता नवदांपत्याच्या सुरक्षेसाठी तब्बल एक कोटी रुपयाचा आरोग्य विमा काढून देण्याचा उपक्रम खडकी (ता.दौंड) येथील संदीप काळे यांनी राबविला आहे. काळे यांनी राबविलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खडकी येथील संदीप काळे यांची कन्या स्नेहल व सागर यांचा विवाह नुकताच संपन्न झाला. संदीप काळे हे अनेक वर्षांपासून कराड येथील शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान सोबत जोडले गेलेले आहेत. शिवमचे संस्थापक इंग्रजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या विवाहप्रसंगी समाजासमोर काहीतरी वेगळा आदर्श ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला होता. या संकल्पनेतून स्नेहल व सागर या नवदांपत्याच्या वैवाहिक जीवनात आरोग्य विषयक सुरक्षेकरिता कन्यादान म्हणून त्यांचा एक कोटी रुपये रकमेचा आरोग्य विमा उतरविण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. यावेळी विमा प्रमाणपत्र शिवमचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित देशमुख व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, कांचन कुल, वासुदेव काळे, अप्पासाहेब पवार यांच्या हस्ते वधूवरांकडे सुपूर्त करण्यात आले. विवाहांमध्ये दोनचाही, चारचाकी किंवा तत्सम वस्तू न देता एक कोटी रुपयांचा विमा उतरवून त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
त्याचबरोबर विवाह प्रसंगी हार, शाल देऊन सत्कार करण्यास फाटा देऊन शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानला ११ हजार रुपयांची राशी दिली. याप्रसंगी शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, प्रताप भोसले, डॉ. विकास गरुड, डॉ. प्रकाश शिंदे, अशोक सस्ते उपस्थित होते.