84187
आंदुर्लेत पर्यावरणपूरक झाडांना राखी
कुडाळ, ता. १३ ः आंदुर्ले ग्रामपंचायतीतर्फे यावर्षी पर्यावरणपूरक सण साजरे करण्याबाबत जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत व गावातील प्राथमिक शाळा यांच्यावतीने वृक्षांना राखी बांधून त्यांचे जतन व संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली आहे. सध्या होणाऱ्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. वृक्षारोपणासह वृक्ष संवर्धन मोहीम राबविणे ही काळाची गरज आहे. याबाबत आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने गावात प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ प्रभावीपणे राबविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. या माध्यमातून ग्रामपंचायतीने पर्यावरण वाचविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असून संपूर्ण गावातील ग्रामस्थांना यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर यांनी केले आहे.
.................
84179
वक्तृत्व स्पर्धेत अद्विता दळवीचे यश
सावंतवाडी, ता. १३ ः शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्विन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत झालेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी अद्विता दळवी हिने प्रथम क्रमांक मिळविला. ‘क्वांटम युगाची सुरुवात : संभाव्यता व आव्हाने’ हा या स्पर्धेचा विषय होता. अद्विताने आपल्या प्रभावी मांडणीने प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय फेरीत प्रवेश केला. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत भोसले, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.