15 ऑगस्ट म्हणजे स्वातत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील अनेक महापालिकांनी मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे, यावरून आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांकडून या निर्णयाचा जोरदार विरोध होत असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
15 ऑगस्ट म्हणजे स्वातत्र्य दिनाच्या दिवशी राज्यातील अनेक महापालिकांनी मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला आहे, यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी म्हटलं की, राज्य सरकारनं कुठलाही असा निर्णय घेतलेला नाही. ‘हा निर्णय 12 मे १९८८ रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतला होता आणि त्यानंतर तो लागू झाला आहे. या निर्णयानुसार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, रामनवमी, महावीर जयंती या दिवशी कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार महापालिकेला देण्यात आला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही कत्तलखाने आणि मांसाहार विक्री दुकाने बंदचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावरून वादंग निर्माण करण्याचा मुर्खपणा काहीजण करत आहेत. शाकाहारी खाणाऱ्यांना नंपुसक म्हणायला लागले आहेत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबईतील कबुतरखाने तुर्तास बंद ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. मात्र यावर जैन समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. कबुतरखान्यावरून राज्याच्या राजधानीमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर देखील आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, आस्थेचा विषय आहे, त्यांची काळजी घेवू शकतो. वस्ती नाही तिथे आपण खाद्याची व्यवस्था करू शकतो. वादाचा विषय नाही समाजाचा विषय आहे. समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था हे दोन्ही विषय आम्ही सोडवू, एका समाजाविरोधात दुसरा समाज उभा केला जात आहे, मुंबई महापालिका निवडणुकीमुळे असं काही जण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अस यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.