Sinnar News : नाशिकमध्ये लम्पीने ८१ जनावरे बाधित; सिन्नर-निफाड तालुक्यात प्रतिबंधात्मक उपाय सुरू
esakal August 15, 2025 11:45 PM

सिन्नर: नाशिक जिल्ह्यात लम्पीने ८१ जनावरे बाधित झाली आहेत. यातील ६३ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून १८ जनावरांवर उपचार सुरु आहेत. सिन्नर व निफाड तालुक्यात प्रत्येकी चार गावांत ही जनावरे आढळून आली असून तेथे पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यात आले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डाँ. प्रशांत धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाय योजना सुरु आहेत. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी १२ दिवसापूर्वीच संसर्ग असलेले क्षेत्र तीन किलोमीटर परिसरात बाधित क्षेत्र म्हणून तर १० किलोमीटर क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला केले आहेत.

जिल्ह्यात सहा लाख १० हजार ६६० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. तथापि, लहान वासरांना लसीकरण करण्यास शेतकऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्यामुळे बाधित होणाऱ्या जनावरांत वासरांचे प्रमाण अधिक आहे. निफाड व सिन्नर तालुक्यात पावसानंतर जनावरे मोकळ्या ठिकाणी चरण्यास सोडत असल्याने अथवा बांधत असल्याने इतर जनावांरे संपर्कात येऊन वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात सहा लाख १३ हजार ७०० लसीच्या मात्राही उपलब्ध झाल्या आहेत. पशुसंवर्धन विभागातील तांत्रिक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रजा रद्द करण्यात आल्या असून लक्षणे दिसताच गाव बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याच्या सूचना आहेत. बाधित गावांतील शेतकऱ्यांना गोठ्यांची स्वच्छता, डास व कीटक प्रतिबंधक फवारणी, सायंकाळी गौरी व लिंबाच्या पाल्याचा धूर करणे, लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.

Pimpri Traffic : बांधकाम साहित्याच्या वाहनांमुळे चिखल, शहरातील स्थिती; अपघाताची शक्यता, वाहनांकडून नियमांचे उल्लंघन

तुलनेने प्रमाण कमी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात संसर्ग प्रमाण कमी असून बाधित गावांत उपाय केले जात आहेत. देवळा व सटाणा तालुक्यातील संशयितांची बुधवारी पाहणी केली. परंतु, ते लम्पीचा प्रादुर्भाव नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

- डॉ. प्रशांत धर्माधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन, नाशिक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.