टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर मैदानात परतला आहे. सूर्यकुमार यादव याने बंगळुरुत बॅटिंग प्रॅक्टीसला सुरुवात केली आहे. बीसीसीआय निवड समितीने आतापर्यंत आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केलेली नाही. मात्र या स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या संभाव्य खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. अशात सुर्या सराव सोडून दुसऱ्याच ठिकाणी निघून गेला आहे. सूर्याने काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सूर्या नक्की कुठे गेलाय? हे जाणून घेऊयात.
सूर्या जपानमध्येभारताचा टी 20i कर्णधार सूर्यकुमार यादव बंगळुरुतील एनसीएतून थेट जपानला पोहचला आहे. सूर्याने इंस्टा स्टोरीतून जपानमधील टोक्योतील काही फोटो पोस्ट केले आहेत. “काही समजलं नाही, मात्र पाहून चांगलं वाटलं”, असं कॅप्शन सूर्याने इंस्टा स्टोरीतील एका फोटोला दिलं आहे. मात्र सूर्या आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जपानला का गेलाय? या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना मिळालेलं नाही. सूर्याच्या जपान दौऱ्यामागील कारण अजून समजू शकलेलं नाही.
भारतीय संघाची घोषणा केव्हा?आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा केली जाणार? क्रिकेट चाहत्यांना याची उत्सूकता लागून आहे. आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. त्याआधी 17 किंवा 18 ऑगस्ट रोजी बीसीसीआय निवड समितीकडून भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईमध्ये होणार आहेत. या 8 संघाना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला साखळी फेरीत 3 सामने खेळावे लागणार आहेत. त्यानुसार टीम इंडियासह अ गटात यूएई, पाकिस्तान आणि ओमान संघाचा समावेश आहे. टीम इंडिया साखळी फेरीत या तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळणार आहे.
Suryakumar Yadav Insta Story
सूर्याच्या खेळण्याबाबत अनिश्चिततादरम्यान सूर्यकुमार यादव आशिया कप स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता आहे. सूर्या या स्पर्धेत खेळणार की नाही? हे संपूर्णपणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. सूर्याला फिटनेसमुळे या स्पर्धेत खेळता न आल्यास त्याच्या जागी शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. सूर्या आयपीएल 2025 नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्यामुळे आता सूर्याबाबत काय निर्णय होतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.