एकेकाळी भाजपात असलेले एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, मात्र मध्यंतरी नाथाभाऊन पुन्हा भाजपात येण्याचा प्रयत्न केला. तशी घोषणाही त्यांनी केली होती, मात्र त्यांचा भाजपचा अधिकृत प्रवेश अद्याप काही पार पडलेला नाही. याच भाजपाचे नेत गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात विळ्या-भोपळ्याचं नात असून त्यांचे सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरूच असतात. मध्यंतरी एकनाथ खडसे यांनी असं विधान केलं होतं की जामनेर येथील तरूणाच्या हत्या प्रकरणात खरे आरोपी पकडले जावेत, असं ते म्हणाले होते.
आता याच मुद्यावरून भाजप नेते, गिरीश महाजन यांनी जे विधान केलं त्यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. जामनेर येथे तरुणाच्या हत्या प्रकरणात खडसे यांच्या मनात काय माहिती नाही,त्यांना कोणता संशय असेल तर ते सांगतील त्यांना अटक केली जाईल. माझंही नाव ते घेत असतील मीही पोलिसाना सरेंडर करून स्वतःला अटक करून घेणार, असं वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना खोचक टोला लावला आहे. जळगावमध्ये ते बोलत होते. जामनेर येथे झालेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात पोलिसांनी आता पर्यंत नऊ लोकांना अटक केली असून पोलिस तपास सुरू आहे, असंही ते म्हणाले. मात्र महजानांच्या या विधानामुळे आता त्यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे असून या टोल्याला खडसे काय प्रत्युत्तर देतात याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.
इम्तियाज जलील यांचं वागणं चुकीचं
15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अनेक महापालिकांनी मटण, मांस विक्रीवर बंदी घातली होती, दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र एआयएमआयएमचे नेते यांनी या बंदीचा विरोध दर्शवत घरी मांसाहार शिजवला होता. यावरूनही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मांस विक्रीवर बंदी असतांना इम्तियाज जलील यांनी मांसाहारी जेवण करून सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न करणं, हे चुकीचे असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटल आहे.
रक्षा खडसे यांनाही लगावला टोला
खडसे कुटुंबातील जावई सध्या पोलिस कोठडीत असून त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावर रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली होती. खडसे कुटुंबावर होत असलेले आरोप, तसेच एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध होत असलेले आंदोलन यामुळे मला वेदना होत आहेत, नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासावर बोलावे, असे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी म्हटले होते. मात्र या विषयावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांनी त्यांच्या घरी सल्ला द्यावा, असे प्रत्युत्तर दिलं असून वातावरण आणखीनच तापण्याची चिन्ह आहेत