बीएमडब्ल्यू गाडी घ्यायची आहे का? तु्म्ही एखादं नवं मॉडेल विकत घेण्याची तयारी केली आहे का? तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण यासाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. जर तुम्हाला अधिकचे पैसे मोजायचे नसतील तर 31 ऑगस्टपर्यंतची वेळ आहे. कारण बीएमडब्ल्यू इंडियाने 1 सप्टेंबर 2025 पासून गाड्यांची किंमत 3 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव किंमत बीएमडब्ल्यूच्या सर्व मॉडेलवर लागू असणार आहे. कंपनीने या मागची कारणंही स्पष्ट केली आहे. सर्वात प्रमुख कारण म्हणजे डॉलर आणि रुपयात होणार चढउतार.. दुसरं म्हणजे गाडी बनवण्यासाठी लागणारं सामान, ट्रान्सपोर्ट खर्च आणि पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी… त्यामुळे त्याचा थेट परिणाम गाड्यांच्या किमतीवर होत आहे. बीएमडब्ल्यूच्या दोन सिरीज ग्रॅन कूपची किंमत 46.90 लाख रुपयांपासून सुरू होते. एक्सएम परफॉर्मन्स एसयूव्हीची किंमत 2.60 कोटी रुपयांपर्यंत ( एक्स-शोरूम ) जाते.
बीएमडब्ल्यूची या वर्षीची ही तिसरी किंमत वाढ असेल. कंपनीने यापूर्वी जानेवारी आणि एप्रिलमध्येही किमती वाढवल्या होत्या. या तीन वाढीनंतर या कार सुमारे 10 टक्क्यांनी महागल्या आहेत. असं असलं तरी वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बीएमडब्ल्यूने चांगली विक्री केली. दुसऱ्या सहामाहीतही ही वाढ कायम ठेवण्याची आशा कार उत्पादक कंपनीला आहे. वाहन उत्पादक कंपनी या सणासुदीच्या हंगामात नवीन आणि शक्तिशाली मॉडेल्स लाँच करण्याची तयारी करत आहे . कंपनी आपल्या ग्राहकांना सोपे ईएमआय, लीजिंग प्लॅन आणि बाय बॅक ऑफरसारखे आर्थिक पर्याय देखील देणार आहे. जेणेकरून लोकांचे प्रीमियम कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
बीएमडब्ल्यू 2 सीरीज ग्रॅन कूपे , 3 सीरीज लाँग व्हीलबेस, 5 सीरीजलॉन्ग व्हीलबेस, 7 सीरीज, X1, X3, X5, X7, M340i आणि iX1 लाँग व्हीलबेस कार तामिळनाडू येथील कारखान्यात स्थानिक पातळीवर असेंबल केले जातात. बीएमडब्ल्यू i4 , i5, i7, i7 M70, iX, Z4 M40i, M2 कूप, M4 कॉम्पिटिशन , M4 CS , M5, M8 कॉम्पिटिशन कूप आणि XM या सारखे मॉडेल हे मॉडेल पूर्णपणे बिल्ट युनिट्स ( CBU ) म्हणून येतात. त्यामुळे आता येत्या सहामाहीत गाड्यांच्या विक्रीत घट होते की वाढते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.