आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर पहिली टी20 स्पर्धा असून वर्ल्डकप स्पर्धेची रंगीत तालीम आहे. त्यामुळे या संघात निवडलेल्या खेळाडूंचं 2026 च्या वर्ल्डकपसाठी स्थान जवळपास पक्कं होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी संघ कसा निवडतात याकडे लक्ष लागून आहे. यासाठी 19 ऑगस्टला घोषणा केली जाणार आहे. सूर्युकमार यादवच्या नेतृत्वात संघ निवडला जाणार हे स्पष्ट आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने या स्पर्धेसाठी संघ निवडला आहे. पण या संघात हरभजनने संजू सॅमसन आणि तिलक वर्माला जागा दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण सध्याच्या संघात हे दोन्ही खेळाडू महत्त्वाचे सदस्य आहेत.
हरभजन सिंगने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, मी माझ्या संघात अभिषेक शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिलला ओपनर म्हणून निवडलं आहे. तर श्रेयस अय्यरला या संघात स्थान दिलं आहे. इतकंच काय तर अष्टपैलू म्हणून संघात वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि रियान पराग यांना निवडलं आहे. इतकंच काय तर रिंकु सिंहची संघात निवड केली नाही. हरभजन सिंहने पुढे सांगितलं की, ‘केएल राहुल एक असं नाव जे मी घेतलं नाही. तो देखील खूप चांगला पर्याय ठरू शकतो. कारण मी इतर विकेटकीपरला ठेवत नाही. केएल राहुल एक चांगला पर्याय ठरू शकतो. तो किंवा ऋषभ पंत पैकी एक टीममध्ये असावा.’
हरभजन सिंगने आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेला संघ: यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
ऋषभ पंतच्या पायाचं बोट फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे पुढचे काही महिने संघातून बाहेर असेल. आशिया कप स्पर्धेसाठी काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे संघात विकेटकीपर फलंदाज म्हणून कोणाची नियुक्ती करतात याची उत्सुकता आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. तर 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना असेल. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानविरुद्ध 19 सप्टेंबरला होईल.