सुरक्षेचा ध्यास, देशसेवेची आस...
esakal August 17, 2025 01:45 PM

रामदास पद्मावार - saptrang@esakal.com

मातीतल्या कणाकणांत शौर्य ओतलेलं… प्रत्येक श्वासात देशभक्ती पेरलेली… अरुणावतीच्या किनाऱ्यावर वसलेलं हरसूल गाव म्हणजे एक चालतं-बोलतं रणांगण! इथल्या मातांनी फक्त मुलांना जन्म दिला नाही, तर मातृभूमीसाठी सैनिक घडवले. इतकंच नाही तर या गावातील तरुण राज्याच्या पोलिस दलातही कामगिरी बजावत आहेत. देशाच्या अंतर्गत पातळीवर आणि सीमेवर इथला तरुण सुरक्षेसाठी सज्ज आहे.

दिग्रस-दारव्हा मार्गापासून दोन किलोमीटर अंतरावरील अरुणावती नदीच्या तीरावर वसलेले तालुक्यातील हरसूल दिसायला लहानसे, पण मनाने विशाल असं गाव! या गावातून आज तब्बल तीस जण सीमेवर तैनात असून देशाचे रक्षण करत आहेत. तर सतरा तरुण महाराष्ट्र पोलिस दलात आहेत. त्यामुळे हरसूलने ‘सैनिकांचे गाव’ ही ओळख कमावली आहे. हा अभिमान गावकऱ्यांच्या मनामनात रुजला आहे. गेल्या काही वर्षांत मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या गावातील युवकांनी जणू देशसेवेचं व्रतच हृदयाशी घट्ट बांधले. फक्त साडेचारशे घरांच्या आणि तीन हजार लोकसंख्येच्या गावात प्रत्येक दहा घरांमागे एक सैनिक अशी अद्वितीय कामगिरी आहे.

विदर्भात इतक्या मोठ्या संख्येत सैन्य दलातील जवान देणारं हे एकमेव गाव असल्याचा सन्मान हरसूलला मिळाला आहे. या गावात वीरपुत्रांची गौरवशाली परंपरा आहे. गावातील कै. दौलतराव मांजरे हे पहिले सैनिक. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विठोबा भगत, महादेव मोरे, भारत शिरनाथ, शालिक वास्कर, संतोष लाभशेटवार, माधवराव तायडे अशा अनेकांनी भारतीय सेनेत सेवा दिली. दौलतरावांनी स्वतःचा मोठा मुलगा अशोक यालाही सैन्यात पाठवले. गया, बिहार येथे दहशतवाद्यांविरुद्ध लढताना तो हुतात्मा झाला. पण यामुळे गावातील तरुणांचा उत्साह कमी न होता, उलट अधिक उंचावला आहे.

सैन्यभरतीसाठी सतत प्रयत्न

भूदल, वायुदल, नौदल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव सुरक्षा दल, औद्योगिक सुरक्षा दल अशा तिन्ही सैन्य दलांपासून ते विविध अर्धसैनिक दलांमध्ये हरसूलची छाप आहे. सैनिक वेगवेगळ्या रेजिमेंट आणि वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. ज्या पद्धतीने शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो, इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होतो, त्याच पद्धतीने गावातील अनेकांनी वाड-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैनिकी परंपरा जपली. गावातील सैनिकांची संख्या वाढावी यासाठी गावकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहेत. गावातील युवकही आपापल्या पद्धतीने देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावातील युवकांना वडील, शेजारी यांच्याकडून प्रेरणा मिळाली असून देशसेवेचा वसा घेतलेले हे युवक नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत. देशाच्या सीमांवर शत्रूंशी दोन हात करणाऱ्या सैनिकांचा देशवासीयांना अभिमान आहे. शौर्य, आत्मसमर्पण आणि त्यागाचे प्रतीक असलेल्या सैनिकांना देशसेवेचे बाळकडू मिळते तरी कुठून? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मनातूनच देशसेवेचे बीज तयार होत असल्याने आज हरसूलचे अनेक युवक देशसेवेत कार्यरत आहेत.

आजी-माजी सैनिकांचे मार्गदर्शन

गावातील आजी-माजी सैनिक, पोलिस सेवेतील युवक गावातील युवकांना मार्गदर्शन करतात. त्यांना तयारीची माहिती, परीक्षेची तयारी तसेच तांत्रिक बाबीची माहिती देतात. हे मार्गदर्शन युवकांना प्रेरणा देणारे ठरत आहे. यामुळे हरसूलच्या युवकांची संख्या सैन्य दलात तसेच पोलिस दलातही वाढत चालली आहे. आता मुलीही या सेवेत येत असल्याने ‘नारी शक्ती’ही देशसेवेसाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. सीमेवर हातावर प्राण ठेवत देशवासीयांचे रक्षण करणाऱ्या जवानांबाबत सर्वांनाच आदर आहे. अशा जवानांमुळेच आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. याचीही आजच्या पिढीला जाणीव आहे.

आर्थिक सुबत्ता आली

पूर्वी लष्करी सेवेची ‘क्रेझ’ नसतानाही अनेकांनी देशसेवा केली. अनेक निवृत्त सैनिक गावातील हलाखीची स्थिती सांगतात. आता गावातील परिस्थिती सुधारली आहे. देशसेवा करून आपल्या मातीप्रति असलेले दायित्व पार पाडले जाते. दुसरीकडे गावाचा विकासही होत आहे. पूर्वी असलेल्या स्थितीत बदल झाला.

आर्थिक सुबत्ताही आली. गावातील युवकांनी देशसेवा करीत गावाची स्थितीही सुधारली. यामुळे आज हरसूलसारख्या छोट्याशा गावाची ओळख जिल्हाभर झाली. हरसूल येथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय. शेतीवर गावाचे अर्थकारण अवलंबून होते. मात्र, बदलत्या काळात शेतीचे कमी झालेले उत्पन्न, लागवड खर्च यातून कुटुंबांचा गाडा चालविणे कठीण झाले. गावातील युवकांनी काळानुरूप पावले टाकली. यामुळे विदर्भातील हरसूल हे लहानसे, पण कर्तृत्वाने मोठे गाव झाले. गावातील पहिले सैनिक म्हणून माजी सैनिक स्व. दौलतराव मांजरे यांनी सैन्यसेवेची परंपरा निर्माण केली. त्यांच्या आदर्शाने प्रेरित होऊन अनेक युवक सैन्य दलात भरती झाले. काहींनी पोलिस दलात दाखल होऊन देशसेवेला वाहून घेतले. एके काळी आडमार्ग रस्त्यावर असलेले हे गाव, अरुणावती धरणाच्या निर्मितीमुळे जुना दारव्हा रस्ता बंद झाल्यानंतर, नव्या दिग्रस-दारव्हा महामार्गावर आले. या बदलामुळे गावाला वाहतुकीची नवी सोय मिळाली आणि विकासाचा मार्ग खुला झाला. कालांतराने येथील अनेक युवक उच्च शिक्षण, उद्योगधंदे आणि विविध व्यवसायासाठी गावाच्या पलीकडे जाऊन आपला ठसा उमटवू लागले.

पोलिस दलातील हरसूलकर

महाराष्ट्र पोलिस दल आणि राज्य राखीव पोलिस दलात दोन तरुणींसह १७ युवक कार्यरत आहेत. गेल्या वर्षी दीपाली नगरे ही आदिवासी समाजातील मुलगी पोलिस दलात दाखल झाली. लातूर येथे झालेल्या भरतीत आणखी ११ युवकांनी पात्रता मिळविली. त्यामुळे आता मुलीही देशसेवेच्या या पवित्र वाटेवर पुढे सरकत आहेत.

अवघ्या १८ व्या वर्षी स्थलसेनेत दाखल झालेला नितीन देशमुख लेहच्या अतिदुर्गम आणि उंच भागात तैनात होता. तिथे खाणं-पिणं तर दूरच, श्वास घेण्यासाठी लागणारा प्राणवायूही कमी होता. तरीही या कठीण परिस्थितीवर मात करून देशसेवा करण्याची मजा काही औरच असल्याचं तो हसत सांगतो.

नव्या पिढीतही देशसेवा

नव्या पिढीतील फिरोज खान, आतिष तायडे, संजय पारधी, अंबादास दुमारे, नीलेश तायडे यांनी निवृत्त होईपर्यंत देशसेवा केली. नितीन देशमुख, तुळशीदास अलोने, गजानन पवनकर, नीलेश सोनोने, सतीश अलोने, देविदास दुमारे, राहुल तळेकर, सुदेश दुधे, किशोर खापरकर, राजेंद्र पारधी, सागर पारधी, जितेंद्र देशमुख, देवानंद भगत, शंकर पवणे, विपुल देशमुख, गजानन दळवी, संदीप नगरे हे आजही देशाच्या वेगवेगळ्या सीमांवर सेवा बजावत आहेत.

सुविधांचा अभाव; जिद्द कायम

हरसूलमधील तरुण कोणत्याही शासकीय मदतीशिवाय, मैदानाविना, फक्त जिद्द, मेहनत आणि अनुभवी सैनिकांच्या मार्गदर्शनावर भरतीसाठी तयारी करतात. गावकऱ्यांचा ठाम विश्वास आहे, की योग्य अभ्यासिका, आधुनिक सुविधांनी युक्त मैदान आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध झाल्यास हरसूलसारखी अनेक गावे सैनिक घडवतील.

  • गावाची लोकसंख्या - ३०००

  • घरांची संख्या - ४५०

  • सीमेवर तैनात सैनिक - ३०

  • महाराष्ट्र पोलिस दलात - १७

  • पहिले सैनिक - कै. दौलतराव मांजरे

  • हुतात्मा योद्धा - अशोक मांजरे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.