संस्कृती-संगमाचा सुरम्य सूर!
esakal August 17, 2025 01:45 PM

डॉ. सिसिलिया कार्व्हालो - saptrang@esakal.com

मुंबईच्या दक्षिण सीमेवरील वसई तालुक्यातील नायगाव ते गुजरातच्या उत्तर सीमेवरील पालघर जिल्ह्यातील डहाणूपर्यंतच्या भौगोलिक परिसरात बोलली जाणारी ‘वाडवळी’ ही मराठीची बोली. वसई ते डहाणूपर्यंत वाडवळी भाषेच्या विविध छटा अनुभवणे हा आनंददायी भाग आहे.

समूहमनाचा हुंकार असलेल्या बोलीत जनमानसाची अभिव्यक्ती अनुस्यूत असते. वाडवळी बोलीच्या उगमाकडे जाताना तिच्या इतिहासाच्या प्रवाहातून विविध संस्कृती संगमाची झुळझुळ ऐकू येते. ‘वाडवळ’ या शब्दाचा अगदी सोपा अर्थ असा घेता येईल- ‘वाडीचे वळ’ ज्या मातीवर आणि त्या मातीत हात घालून काम करणाऱ्या कामगारांच्या हृदयावर उमटलेले आहेत तो वाडवळ. त्यांची बोली ती वाडवळी. किंवा असेही म्हणता येईल, की ‘वाड’वडिलांचे ‘वळ’ण, उच्चारण ज्या बोलीतून झाले; ज्यातून त्यांनी समूहसंवाद साधला आणि ज्यावर समाज उभा राहिला ती वाडवळी!

या वाडवळ समाजाचा उद्गम आणि विकास बघणे मनोरंजक आहे. अल्लाउद्दीन खिलजीने (१२६६-१३९६) पैठणवर केलेल्या चढाईत (तेराव्या शतकातील अखेरचे दशक) तेथील राजा रामदेव व त्याचा पुत्र प्रताप शहा मारले गेले. नंतर दुसरा मुलगा बिंब याने गुजरातमधील अहिनलवाड येथे पलायन केले. तेथून समुद्रमार्गे उत्तर कोकणात- म्हणजे आजचे पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांत येऊन त्याने येथील लहान राजांना पराभूत केले व या भागात आपला अंमल बसविला. उत्तर कोकणाची दयनीय अवस्था पाहिल्यानंतर हा प्रदेश नव्याने वसवण्यासाठी चंपानेर आणि पैठणहून त्याने सहासष्ट कुळे आणली. यात कुणबी, भंडारी, कुंभार, सुतार, सोनार, नाभिक, पाठार, प्रभू इत्यादींचा समावेश होता. सत्तावीस कुळे सोमवंशीय क्षत्रिय, तर बाकी सूर्यवंशी आणि शेषवंशी होती. सोमवंशी क्षत्रियांपैकी अनेक जण शेतीवाडीकडे वळले. हा वाडवळ समाज!

बहादूरशहाचा पराभव करून पोर्तुगीजांनी उत्तरेकडील प्रांत १५३३ मध्ये जिंकून घेतला. या काळात काही वाडवळ समाजातील कुटुंबांनी ख्रिस्ती धर्मस्वीकार केला. हा सर्व मराठी भाषक समाज मूळचा आगरी, कुणबी, भंडारी, कुंभार, सुतार, सोनार, नाभिक, असा वाडवळी, सामवेदी आणि कोळी समाज आहे. या एकूणच ख्रिस्ती समाजाला सरकारी गॅझेटपत्रात ‘ईस्ट-इंडियन’ असे संबोधले आहे.

चिमाजी अप्पांनी १७३९ मध्ये वसई जिंकली. हा समाज श्रमजिवी असल्याने सत्तांतराचा त्यांच्या जीवनावर विशेष परिणाम झाला नाही. तथापि, पोर्तुगीज राजवटीचा परिणाम ख्रिस्ती समाजाच्या भाषा, भूषा, भवन, भोजन आणि भजनपद्धतींवर मात्र झाला.

वसईतील मराठी भाषक ख्रिस्ती समाजात मराठीच्या ज्या विविध बोली प्रचलीत आहेत त्यांवर पोर्तुगीज, लॅटिन, इंग्रजी, हिब्रू, अरबी, फारसी इत्यादी संस्कृतींचे संस्कार आहेत. तसेच गुजराती, कोंकणी, कानडी आणि अन्य प्रादेशिक भाषांतील शब्दही येथे सहजतेने, हातात हात गुंफून वावरत असतात. वसईत कार्यरत असलेल्या स्पॅनिश धर्मगुरूंनी स्वयंपाकी म्हणून स्थानिक मराठी ख्रिस्ती व कित्येकदा तर पोर्तुगाल, स्पेन येथील पुरुषांना नेमलेले असे. त्यांच्याकडून पोर्तुगीज-स्पॅनिशमिश्रीत मराठी भाषा बाजारापर्यंत पोहोचली. तेथून बाजारहाट करणाऱ्या महिलांपर्यंत आणि त्यांच्याकडून स्वयंपाकघरात म्हणजे एकूणच कुटुंबात पोहोचली. मराठी भाषक ख्रिस्ती वाडवळी समाजात प्रचलित असलेले परकीय भाषा-प्रभावीत शब्द बघा-

पोर्तुगीज प्रभावाचे शब्द- सुशेगात (आरामात, निवांत), मालादिसांव (Mal-Di-Sao- शापवाणी), तुवाल (टॉवेल/ तावालिया), तायलीन- रुमाल, बेजिमेन (Begimenta- आशीर्वाद देणे), आशार (लोणचे), आद्रेसांव (odoration- भक्ती), पिरसांव (Procession- मिरवणूक), पाय (वडील), माय (आई), आओ (आजीबाई), आपाय (o pai- आजोबा), सावी (चावी)

फारसी/अरबी प्रभावाचे शब्द- बरकत (भरभराट), श्यामत (हिंमत), जाम (पेला), जुरूक (थोडंसंं), खोबा- अरबीत ‘घुर्बा’ म्हणजे थैली, त्याचा अपभ्रंश खोबा- ओंजळ, तक्टी (तिरडी)- ‘तख्त’चा अपभ्रंश, पण नकारात्मक भाव व्यक्त करण्यासाठी, खलाट- खालीत (रिकामा, निकामी, नापीक)

लॅटिन प्रभावाचे शब्द- आल्लेलुया (हालेलुया- परमेश्वराचा गौरव असो), कुन्यात (बहिणीचा नवरा/ भावाची बायको), जेजुस (जीझस, येशू ख्रिस्त)

इंग्रजी प्रभावाचे शब्द-बल (बल्ब- दिवा), बनात (ब्लँकेट), ठेसन (स्टेशन), शीक (आजारी), वल (veil- चर्चमध्ये जाण्यासाठी स्त्रियांनी डोक्यावरून पांघरायचे आवरण), बाल्टीम (बॅप्टिझम), टेंपरवारी (टेंपररी- तात्कालिक), शिमिट्री (दफनभूमी), आल्तेर (वेदी- Alter), शिनेलं (Sandle- भरजरी, नक्षीदार बूट), रजार (रोझरी- जपमाळ)

गुजरातीतून आलेले शब्द- आपवणे (विकत आणणे/ देणे), कागळा (कावळा), घणा (जास्त). इतरही काही भाषांतील शब्द वाडवळीत आहेत.

भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी ख्रिस्ती समाजात सुखेनैव नांदत असतात. राम, रामबाण औषध, परदक्षिणा (प्रदक्षिणा), सती-सावित्री-सीता, द्रौपदी, वनवास, पितरं इत्यादी.

मराठी भाषक पानमाळी, वाडवळी समाजात प्रचलित असलेल्या आणि ख्रिस्ती वाडवळी समाजात प्रचलित असलेल्या बोलीतील साम्यही नजरेत भरण्यासारखे आहे. पैराणी- पैरावणी (लग्नात दिला जाणारा आहेर), पराणी (अणकुचीदार), पाजवणे (परजणे), पाणी (पाऊस), बांडी (रहाटाचे गाडगे), मुरकूट (डास), मोरली (विळी), इखारी, विखारी (विषारी), बिजं (दुसरं), बिराड (बिऱ्हाड), बिस्तिरवार (बृहस्पतीवार- गुरुवार), येल (वेल), वरलं (उरलेलं), बाव (विहीर), सोकरी (मुलगी), डोकरी (म्हातारी)इ.

मराठी भाषक ख्रिस्ती समाजीय वाडवळी बोलीत ‘स’चा ‘ह’ होतो (उदा. साखळी- हाकळी, सकाळ- हकाळ, सूज- हूज), ‘च’चा ‘श’ होतो (चार- शार, चिंचोका- शिसोका, चकणी- सकणी), ‘भ’चा ‘ब’ होतो (भांडी- बांडी), ‘व’चा ‘य’ होतो (वेडा- येडा, वेलची- यळशी), ‘क’चा ‘ख’ होतो (डोकं- डोखं), ‘ह’चा ‘व’ होतो (पाहुणा- पावणा), ‘झ’चा ‘ह’ होतो (झावळी- हावळी). अर्थात नियमाला अपवाद असतात तसे येथेही घडते. उदा. ‘संसार’चे ‘संसार’ हेच रूप राहते.

प्रमाण मराठी भाषेत यादवकालीन मराठी शब्द मोठ्या प्रमाणात आढळतात, तसेच महानुभाव साहित्यातील अनेक शब्दप्रयोग वाडवळी बोलीत इतस्ततः विखुरलेले आहेत. लीळाचरित्र- एकांकमधील काही उदाहरणे अशी- बिदी- झाडापानांनी लदबदलेला रस्ता (एकांक- लीळा-२), उगवणे- मोकळे होणे, गुंता उलगडणे (लीळा-८ मध्ये उल्लेख)- वाडवळीत- ‘यं उगवासं कोणी?’- हे सोडवायचं कोणी?...

हे लोकगीत पहा-

‘घाटावरनं डेवला रे जोगी

जोगी वाजविते रे जोगी वाजविते रे

नाना का पनकारा ।।धृ।।

जोग्यासरी जाशील। काय गो दुये खाशील?

आये खाईन गे, आये खाईन गे

वडाची वडफळं ।।१।।

जोग्यासरी जाशील। कंय गो दुये रेशील?

आये रेईन गे, आये रेईन गे

वडाच्या छायेखाली ।।२।।’

मुलगी लग्नाची झालेली आहे, परंतु ती काही लग्न करण्याचं मनावर घेत नाही! कॅथलिक समाजात शालेय शिक्षण संपलं, की एक तर मुलींची लग्नं जमवली जात किंवा त्या मुलीला जर व्रतस्थ राहून मठवासी व्हायचं असेल, तर ती तसा निर्णय घेते. या गीतात आई आपल्या लेकीला तिचा निर्णय विचारते आहे. घाटावरून उतरलेला जोगी म्हणजे येशू ख्रिस्त वा येशूचे अनुयायीत्व पत्करलेला योगी. तो डोंगरावरून उतरला- म्हणजे स्वतःला देवपुत्र म्हणवणारा हा जोगी सामान्य लोकांत आला, त्यांच्याशी समरस झाला. त्या जोग्याच्या शब्दांवर विसंबून जर तुला व्रतस्थतेचा मार्ग अवलंबायचा असेल, त्याच्याबरोबर जायचं असेल तर तू काय खाशील? ती तरुणी म्हणते, मी वडाची फळं खाऊन राहीन. कोठे राहशील? वडाच्या सावलीत आसरा घेईन. हा जोगी नाना ‘पनकार’- म्हणजे ‘फनकार’- विविध कलेचा आविष्कार करणारा असा आहे. हे वर्णन एखाद्या कलावंतालाही लागू पडणारे आहे. एखादी तरुणी कफल्लक कलावंताच्या प्रेमात बुडालेली आहे; तिचाही हाच सकारात्मक दृष्टिकोन.

या गीतातील पौराणिक संदर्भही एके ठिकाणी मला सापडला. पार्वतीने शंकराबरोबर विवाह करणार असे आपल्या आई-वडिलांना सांगितले. भस्मविलेपित शंकराबरोबर ती लग्न करणार म्हणून आई-बापाने विचारलेले प्रश्न आणि पार्वतीची उत्तरे! नाना ‘फनकार’- पाव्याची धून वाजवणाऱ्या कृष्णावर अनुरक्त झालेली गोपिका; असाही अर्थ या गीतातून निघू शकतो.

जितके विविध अर्थ एखाद्या लोकगीतातून प्रतीत होतील, तितकी त्या गीतातील शब्दांची आणि बोलींची निर्मितीक्षमता सूचित करतात. त्यामुळेच तर सकस आणि सत्त्वशील अर्थाची निर्मिती आल्हाददायक ठरते. मराठीच्या या बोलींतून असे संस्कृती-संगमाचे सूर संपृक्त होऊन सळसळताना दिसतात!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.