उत्सवात विरजण…दहीहंडीची रस्सी बांधताना तोल गेला, मुंबईतील धक्कादायक घटना; विविध ठिकाणचे जखमी किती?
Tv9 Marathi August 17, 2025 02:45 PM

राज्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच आता महाराष्ट्र नगर मानखुर्द येथे दही हंडीची रस्सी बांधताना खाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे. दही हंडीची रस्सी बांधताना बाल गोविंदा पथकचा एक सदस्य खाली पडला होता, लगेज त्याला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र भर्ती करण्याच्या पूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जगमोहन शिवकिरन चौधरी (32) असं या गोविंदाच नाव आहे.

दहीहंडी उत्सवातील जखमी गोविंदांची माहिती विविध सरकारी आणि बीएमसी रुग्णालयांनी दिली आहे. यानुसार दुपारी 3 वाजेपर्यंत 30 गोविंदा जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे…

मुंबईत आतापर्यंत 30 गोविंदा जखमी, 15 जणांना डिस्चार्ज तर 15 जणांवर उपचार सुरू

  • मुंबई शहर – जखमी 18; उपचार सुरू 12 , डिस्चार्ज – 6
  • मुंबई पूर्व उपनगर – जखमी 6; उपचार सुरू 3, डिस्चार्ज 3
  • मुंबई पश्चिम उपनगर – जखमी 6; उपचार सुरू 1, डिस्चार्ज 5
  • एकूण – 30 जखमी; उपचार सुरू- 15; डिस्चार्ज 15

याआधी रविवारी दहिसर परिसरात दहीहंडीच्या सरावादरम्यान एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. हा मुलगा सहाव्या थरावर उभा होता, मात्र अचानक संतुलन बिघडल्याने तो खाली पडला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान दहीहंडीचा हा सराव परवानगीशिवाय सुरु होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दहीहंडी उत्सवात सुरक्षा महत्वाची

दहीहंडी उत्सवात अनेकदा अपघात होत असतात. यातील बरेच अपघात हे सुरक्षेची खबरदारी न घेतल्याने होतात. दहीहंडीच्या उत्सवात वर चढणाऱ्या गोविंदांना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, खाली गादी असणे आवश्यक आहे. तसेच अपघात झाला तरी तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका आणि इतर व्यवस्था देखील असणे गरजेचे आहे.

मुंबईत मुसळधार पावसात दहीहंडी

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसातही दहीहंडी मोठ्या उत्सवात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.