कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे कामकाज सोमवारपासून सुरू होतंय. सीपीआर रुग्णालयासमोरील इमारती यासाठी सज्ज झाल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल.
कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस चालेल. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड आणि दुपारी अडीच ते साडेचार अशा दोन सत्रात कामकाज होईल.
सर्किंट बेंच म्हणजे न्यायालयाचं एक तात्पुरतं ठिकाण असतं. उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठराविक काळ येतात आणि खटले चालवतात.
सर्किंट बेंचची स्थापना करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना असतो. तर अधिसूचना राज्यपाल प्रसिद्ध करतात.
खंडपीठ हे कायमस्वरुपी असतं. त्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीं सर्वोच्च न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवतात. त्यानंतर राष्ट्रपती अधिसूचना जारी करतात.
सर्किट बेंच आणि खंडपीठ या ठिकाणी न्यायदानाची पद्धत अन् प्रक्रिया एकच असते. सर्किट बेंच भविष्यात खंडपीठ होऊ शकते.
सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्तींची नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरुपाची असते आणि खंडपीठात न्यायमूर्ती कायमस्वरुपी असतात.