सद्गुरूंच्या माती वाचवा चळवळ आणि एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (17 ऑगस्ट) एसआरएम युनिव्हर्सिटी कॅम्पस, कट्टनकुलथूर, चेन्नई येथे कृषी स्टार्ट-अप महोत्सव 2.0 आयोजित करण्यात आला होता. या खास महोत्सवात 5000 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. यात शेतकरी, गृहिणी आणि शेती आधारित व्यवसाय करु इच्छिणाऱ्या तरुणांचा समावेश होता.
कृषी स्टार्ट-अप महोत्सवात सहभागी झालेल्या लोकांना उद्योजकता कौशल्याने सक्षम बनवून शेती फायदेशीर आणि शाश्वत कशी बनवायची यावर भर देण्यात आला. अनेक अनुभवी व्यावसायिकांनी सहभागी लोकांना मार्गदर्शन केलं. हा कार्यक्रम लाईव्ह-स्ट्रीमिंग देखील करण्यात आला. त्यामुळे शेकडो लोक ऑनलाइन पद्धतीनेही यात सहभागी झाले होते.
आजच्या महोत्सवाची सुरुवात माती वाचवा चळवळीचे समन्वयक स्वामी श्रीमुख यांच्या स्वागत भाषणाने झाली. या महोत्सवाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यात कोल्लमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष नरेंद्र कुमार आणि केंद्रीय कृषी विस्तार कार्यालयाचे संयुक्त संचालक सेल्वम नीरावी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमात बोलताना एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. मुत्तामिझचेलवन म्हणाले की, ‘आम्ही आमचे संस्थापक डॉ. परिवेंदर यांच्या मार्गदर्शनाखाली अचिरापक्कम येथे कृषी विज्ञान महाविद्यालय चालवत आहोत. शेती आधारित व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या लोकांना आम्ही जागा आणि आर्थिक मदत करतो. आम्ही अडीच वर्षांसाठी ही मदत देतो.
कृषी स्टार्ट-अप महोत्सवात नाबार्डचे महाव्यवस्थापक हरी कृष्णन म्हणाले की, ‘मदुराई अॅग्री-बिझनेस इन्क्युबेशन फोरम (MABIF) द्वारे, आम्ही दक्षिण तामिळनाडूमधील ग्रामीण लघु कृषी उद्योजकांना आणि महिलांना त्यांच्या कल्पनांचे व्यवसायात रूपांतर करण्यासाठी मदत करतो. तसेच मार्केटिंग करण्यासाठीही आवश्यक ते मार्गदर्शन करतो. तसेच NABKISSAN द्वारे स्टार्ट-अप्सना कर्ज देखील दिले जाते. तसेच अॅग्री श्योर पूर्ण विकसित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधी प्रदान करते. आगामी काळात नाबार्ड ईशाच्या सेव्ह सॉइल चळवळीला मदत करेल.’
मदुराई थाना फूड प्रोडक्ट्सच्या संस्थापक धनलक्ष्मी विघ्नेश यावेळी म्हणाल्या की, ‘आम्ही पारंपारिक भाताच्या जातीपासून मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक विशेष पीठ विकसित केले आहे. तसेच आम्ही आता 100 हून अधिक उत्पादने बनवतो. आम्ही 8 देशांमध्ये याची निर्यात करतो आणि आम्हाला दरमहा 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.’
सी चेंज बिझनेस कन्सल्टिंग आनंदचे संस्थापक एम.के. आनंद म्हणाले, ‘जागतिक स्तरावर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आर्थिक वाढीच्या 50% मध्ये योगदान देतात. भारतात त्यांचा एकूण उत्पादनात 30% वाटा आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, एखाद्याने स्वतःची ताकद, बाजार मूल्य, आर्थिक संसाधने, कच्च्या मालाची उपलब्धता याची माहिती समजून घेणे गरजेचे आहे. देशातील नवीन उद्योजकांसाठी 10 पेक्षा अधिक सरकारी योजना उपलब्ध आहेत.’
या खास कार्यक्रमात कन्नन हरी – पाम एरा फूड्स, अर्चना स्टॅलिन – माय हार्वेस्ट फार्म्स, चेन्नई, वसंतन सेल्वम – फलोत्पादन उद्योजकता विकास केंद्र, पेरियाकुलम, अश्विन कुमार – पॅकेजिंग तज्ञ, मदुराई हे मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक स्टॉल्ससह कृषी उत्पादने आणि लघु-स्तरीय कृषी उपकरणांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.
दरम्यान, सद्गुरूंनी सुरू केलेली माती वाचवा चळवळ ही मातीचे आरोग्य पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि मातीचा ऱ्हास रोखण्यासाठीचा एक जागतिक उपक्रम आहे. ही चळवळ शेतकऱ्यांना बहुपिकीय आणि नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहित करते. यामुळे मातीची सुपीकता वाढते, पाणी वाचते आणि रसायनांचा वापर थांबतो. यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि नफा देखील वाढतो.
गेल्या 15 वर्षांत या चळवळीच्या माध्यमातून 35000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील 10 हजार शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळले आहेत. सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे शेतकऱ्यांना स्वावलंबी उद्योजक बनण्यासाठी मार्केटिंग आणि व्यवसायाची कौशल्ये शिकवली जातात. याचे मुख्यालय, ईशा योग केंद्र, वेल्लिंगीरी पर्वतरांगांच्या पायथ्याशी, ईशान विहार पोस्ट, कोइम्बतूरमध्ये आहे.