मुंबई… स्वप्नांचं शहर म्हटलं जातं, इथे अनेक जण बाहेरून आपली स्वप्न पूर्ण करायला येतात, काहींती स्वप्न पूर्ण होतात तर काहींची अधूरीच राहतात, पण तरीही मुंबईकडे असणारा लोकांचा ओढा कमी होत नाही. मात्र याच मुंबईत गेल्या 4 दिवसांत घडलेल्या 3 धक्कादायक घटनांन सगळेच हादरले आहेत. मुंबईकरांचे रक्षण करण्याची जबाबादारी खांद्यांवर असलेल्या पोलिसांनीच टोकाचं पाऊल उचलत त्यांचं आयुष्य संपवलं असून मागील 4 दिवसात तीन पोलिसांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांच्या आतमहत्याचं सत्र सुरू आहे. मात्र या तिघांही पोलिसांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण पोलिसांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
गोकुळाष्टमीच्या दिवशीच संपवलं जीवन
यापैकी एका पोलिसाने गोकुळाष्टमीच्या दिवशीच म्हणजेच शनिवारी त्यांचं आयुष्य संपवलं. मुकेश देव ( वय 45) असे मृत पोलिसाचं नाव असून ते मरोळच्या सशस्त्र पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. देव हे अंधेरी पूर्वेला आगरकर बस आगाराजवळ असलेल्या पोलीस वसाहतीत रहात होते. शनिवारी सगळीकडे गोकुषाष्टमीची धूम होती, सगळेजण उत्साहात सण साजरा करत होते. दहीहंडी फोडण्यासाठी पथकांची चढाओढ सुरू होती. बाहेर सर्वजण सण मजेत, उत्साहात साजरा करत असताना पोलीस कर्मचारी मुकेश देव हे मात्र त्यांच्या घरात एकटेच होते. दुपारी 4 च्या सुमारास देव यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, आयुष्य संपवलं.
त्यांच्या आसपासच्या लोकांना ही घटना कळताच त्यांनी धाव घेतली आणि देव यांना पुढील उपचारासाठी जुहूच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जौंजाळ पुढील तपास करत आहेत.
4 दिवसांत तिघांनी संपवलं जीवन
मुंबईत पोलिसांनी आत्महत्या करण्याची ही मागील 4 दिवसातील ही तिसरी घटना आहे. शनिवारी मुकेश देव यांनी आयुष्य संपवलं. तर बुधवारी 13 ऑगस्ट रोजी कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यातील गणेश राऊळ (वय 32 ) या पोलिसाने नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
तर दुसरी आत्महत्या भाईंदर मध्ये झाली. गुरूवार 14 ऑगस्ट रोजी भाईंदर मध्ये राहणार्या ऋतिक चौहान (वय 25) या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या करत त्याचं आयुष्य संपवलं. आणि आता शनिवारी अंधेरीत राहणाऱ्या मुकेश देव (वय 45) या पोलिसानेही जीवनाचा शेवट कला. 4 दिवसांत तिघांच्या आत्महत्येमुळे पोलीस दल आणि मुंबईकरही हादरले आहे. मात्र या तिघा पोलिसांनी आत्महत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.