मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जून तेंडुलकर गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अर्जून आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक या दोघांचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी अर्जूनला मोठा झटका लागला आहे. अर्जूनला 28 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या महत्त्वाच्या स्पर्धेतून वगळण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र अर्जूनला डच्चू देण्यात आला आहे. अर्जून देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचं प्रतिनिधित्व करतो. अर्जूनला दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र अर्जूनला नॉर्थ इस्ट झोनकडून संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अर्जूनसाठी हा मोठा झटका आहे.
अर्जूनला नो एन्ट्रीअर्जूनने रणजी ट्रॉफी स्पर्धेत प्लेट ग्रुपमधील 4 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र अर्जूनवर निवड समितीने दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी विश्वास दाखवला नाही. रोंगसेन जोनाथन दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ इस्ट झोनचं नेतृत्व करणार आहे. नॉर्थ इस्ट झोनचा 28 ऑगस्टला सेंट्रल झोन विरुद्ध सामना होणार आहे.
अर्जून तेंडुलकर 2022-23 या हंगामापासून गोव्याकडून खेळतोय. ऑलराउंडर अर्जूनने गोव्याकडून पदार्पणातील सामन्यातच फर्स्ट क्लास शतक केलं. अर्जूनच्या नावावर आतापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 37 विकेट्स घेण्यासह 532 धावा केल्या आहेत.
तसेच अर्जूनने नोव्हेंबर 2022 मध्ये गोव्यासाठी लिस्ट ए डेब्यू केलं होतं. अर्जूनने तेव्हापासून 18 सामन्यांमध्ये 25 विकेट्स घेण्यासह 102 धावा केल्या आहेत. अर्जूनने गोव्याआधी मुंबईसाठी टी 20 पदार्पण केलं होतं. तसेच अर्जून आयपीएलमध्ये 2021 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघातील अनेक प्रमुख खेळाडूही सहभागी होणार आहेत. यामध्ये शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. शुबमन दुलीप ट्रॉफी स्पर्धेत नॉर्थ झोनचं नेतृत्व करणार आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नॉर्थ विरुद्ध इस्ट झोन आमनेसामने असणार आहेत. हा सामना 28 ते 31 ऑगस्टदरम्यान होणार आहे. तर अंतिम सामना हा 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे बीसीसीआयच्या सेटंर ऑफ एक्सीलेंसमध्ये होणार आहेत.