Kolhapur Circuit Bench: 'सरन्यायाधीशांनी जिंकली सर्वांची मने'; सर्किट हाऊसवर दोन तासांहून अधिक काळ गाठीभेटी
esakal August 18, 2025 09:45 PM

कोल्हापूर: देशाचे सरन्यायाधीश म्हटल्यानंतर प्रचंड सुरक्षा कवच. त्यातून ते आपल्याला भेटतील का? भेटले नाहीत तर किमान दूरवरून पाहता तरी येतील का?, या विचाराने आलेल्या नागरिकांची केवळ भेट नव्हे, तर शिष्टाचार, सुरक्षा बाजूला ठेवत त्यांच्याशी हस्तांदोलन करत फोटो काढून घेत, अनेकांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी सर्वांचीच मने जिंकली. त्यांनी सामान्य माणसांपासून बंदोबस्तातील पोलिसांसोबतही चर्चा करत भेट संस्मरणीय केली.

Success Story: 'सातारच्या सोहम घोलपला गुगलमध्ये ४० लाखांचे पॅकेज'; कष्टाच्या जाेरावर यशाला गवसणी, संभाषणात्मक एआय सल्लागारपदी निवड

सर्किट हाऊसवर थांबलेल्या सरन्यायाधीश गवई यांच्या आजच्या सकाळच्या सत्रातील नियोजनात काही ठरावीक लोकप्रतिनिधी, नागरिक, वकिलांच्या भेटी ठरल्या होत्या. त्यामुळे सकाळी दहापर्यंत तिथे सुरक्षा पास असल्याखेरीज प्रवेश दिला जात नव्हता. मोठा पोलिस बंदोबस्त होता. तसेच मोजकेच लोक सर्किट हाऊसमध्ये होते. त्यादरम्यान, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भेट घेतल्यानंतर माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या प्रकृतीची सरन्यायाधीशांनी विचारपूस केली. यावेळी, ‘४२ वर्षांपासून वकील, पक्षकार, नागरिकांच्या सर्किट बेंचच्या लढ्याची स्वप्नपूर्ती तुमच्यामुळे पाहायला मिळाली,’ या शब्दांत आमदार पाटील यांनी सरन्यायाधीश गवई यांचे आभार मानत सत्कार केला. त्यानंतर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. डॉ. अरुंधती पवार, प्रा. डॉ. मंजुश्री पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह विविध जिल्ह्यांतून आलेले वकील, सामाजिक संघटना, वकील संघटना, नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची भेट घेतली.

अनेक जण नमस्कार करण्यासाठी हात जोडत असताना सरन्यायाधीश हात पुढे करत हस्तांदोलन करत होते. त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याची अनेकांची इच्छा त्यांनी पूर्ण केली. सरन्यायाधीशांच्या या विनयशीलतेचा सुखद धक्का घेऊन सारे जण बाहेर येत होते. एक जुना वकील सहकारी भेटल्यानंतर चर्चा करताना त्याच्या मुलीच्या विवाहाची आठवण काढत, आता ती कशी आहे, अशा आस्थेवाईकपणे केलेल्या विचारपुसीमुळे तो सहकारी भारावूनच गेला. न्यायालयातील कर्मचारी, त्यांच्या संघटनांच्या सदस्यांची तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशीही सरन्यायाधीशांनी फोटो काढून घेतले.

अखेर त्यांनी कोचवर बसून भेटीगाठी घेतल्या. हेरिटेज वास्तूमध्ये सर्किट बेंच होत असल्याने त्यांना कोल्हापूरच्या हेरिटेज ठेव्याची माहिती देणारे राजर्षी शाहूंची फोटोबायोग्राफी पुस्तक पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी भेट दिले. त्यावेळी त्यांनी तिथेच ते पुस्तक चाळत विविध फोटो व माहितीवर नजर टाकली. प्राचार्य डॉ. जे. के. पवार व दिग्विजय पवार यांनीही ‘राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके’ याबरोबरच अन्य दोन पुस्तके भेट दिली. स्मारकांबाबतच्या या पुस्तकाबाबत विचारणा केल्यानंतर पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विविध पैलूंवर प्रकाशित झालेल्या विविध ग्रंथांचा परिचय यात करून दिला आहे. बुक ऑन बुक्सवर या संकल्पनेतून हे पुस्तक तयार केल्याचे सांगितल्यानंतर ‘छान, सारे पैलू एकाचवेळी अभ्यासायला मिळतील,’ असे त्यांनी सांगितले.

MPSC Success Story: एमपीएससी परीक्षेत माेहिनी गाेळे-किर्दतची हॅट्रीक';वडिलांनी पिठाची गिरण चालवून स्वप्नांना दिलं बळ,यशाला घातली गवसणी वाटेत थांबून विद्यार्थिनींकडून घेतला पेढा

नृसिंहवाडीवरून आई-वडिलांसह सरन्यायाधीशांना भेटण्याच्या इच्छेने जान्हवी माने ही शालेय विद्यार्थिनी आली होती. त्यावेळी सरन्यायाधीश सर्किट हाऊसवरील कार्यक्रम आवरून बाहेर पडत होते. गाडीत बसण्यासाठी जात असताना ही मुलगी भेटली. सर्किट बेंचचा निर्णय घेतल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ नृसिंहवाडीवरून प्रसादाचा पेढा आणल्याचे सांगताच सरन्यायाधीश गवई यांनी थांबून हसत हसत तिचा पेढा घेतला. त्याबरोबरच एक सामान्य नागरिक तेथील पोलिसाला ‘गवईसाहेबांना फक्त माझे नाव सांगा’ असे सांगत खिशातील त्यांच्यासोबतचा फोटो दाखवत भेट घालून देण्याची विनंती करत होता. आणखी एक कुटुंब दूरवरून सरन्यायाधीशांना पाहण्याच्या प्रयत्नात होते. इतरांच्या सोबत त्यांचीही भेट घेतली. या घटनांमधून सरन्यायाधीशांची सामान्यातील सामान्यांशी जुळलेली नाळ व सहृदयी स्वभावाचे दर्शन उपस्थितांना घडवले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.